अकोला : आंतरराज्य साखळीचाेर टोळीचा पर्दाफाश करण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. अनेक राज्यात २५ पेक्षा जास्त गुन्हे करणाऱ्या साखळीचोरीच्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी गुजरात व नागपूर येथून एकाचवेळी ताब्यात घेतले. अकोल्यातून एका महिलेचे मंगळसूत्र चोरले होते.
पोलिसांचा दंडुका पडताच चोरट्यांनी कबुली दिली. पोलिसांनी चोरट्यांना घेऊन जात संबंधित महिलेला ते मंगळसूत्र परत करून माफी मागायला लावली. या संपूर्ण घटनाक्रमाची एक चित्रफित समाजमाध्यमावरून प्रसारित होत आहे.
शहरातील आनंद नगर येथे महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून दोन आरोपी दुचाकीवरून फरार झाले होते. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात कलम ३०४ भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल झाला. साखळीचोरांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने ३०० कि.मी. अंतरावरचे २०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरांचे छायाचित्रण तपासून आरोपी निष्पन्न केले. तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी दीपक लाला परमार (वय २३ वर्ष, रा. ग्राम कलोल जि. गांधीनगर राज्य गुजरात, ह.मु. शितलवाडी रामटेक, जि. नागपूर) याला नागपूर येथून ताब्यात घेतले. राकेश राजू पटानी (वय २३ वर्ष रा. सफाट व्यास, हिम्मतनगर, जि. साबरकांठा, राज्य गुजरात) याला गुजरातमधील हिम्मतनगर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने पकडले.
दोन्ही आरोपीतांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात चोरी गेलेले १५ ग्रॅम सोन्याचे दीड लाखाचे मंगळसूत्र आरोपींकडून जप्त केले. या आरोपींविरूध्द गुजरात राज्यातील पालनपूर, शेरकोटळा, सिद्धपूर, हिम्मतनगर, ओधव, कलोल, मधापूर, बापूनगर, उमरेठ आदी पोलीस ठाण्यांमध्ये २५ पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपींना खदान पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुन्ह्यासाठी दुचाकी चोरली
सोनसाखळी पळवण्यासाठी आरोपींनी शेगाव येथून दुचाकी चोरली होती. त्याचा वापर गुन्ह्यात केला. आरोपींनी केवळ चोरी करण्यासाठी नवीन सीमकार्ड घेतले होते. काम होताच ते बंद केल्याने आरोपींचा शोध घेणे आव्हानात्मक झाले होते. गुजरातमधील आरोपीला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग ३६ तास प्रवास करून आरोपीला अकोल्यात आणले.