नागपूर : लाँग मार्चचे प्रणेते, माजी आमदार तसेच पीपल्स रिपबल्किन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांना शनिवारी आंबेडकरी अनुयायांच्या संतापाला पुढे जावे लागले. प्रा. कवाडे भट सभागृहातील कार्यक्रमात भाषणाला उभे होताच त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत उपस्थितांनी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांना भाषण न करताच कार्यक्रम सोडून जावे लागले. त्यांचा पक्ष सध्या भाजप महायुतीसोबत असल्याने त्यांचा विरोध करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासंदर्भातील माहिती देशभरातील बौद्ध समाजापर्यंत पोचवण्यासाठी शनिवारी (दि.१६) रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाबोधी विहार आंदोलनाचे अग्रणी भंते विनयाचार्य तसेच भगवान बुद्ध यांची भूमिका साकारणारे अभिनेते हिमांशू सोनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात बीटी ॲक्ट १९४९ रद्द करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. यावेळी भारतीय भिक्षसंघाचे भंते रेवत संघनायक, भंते उपगुप्त, भीमराव आंबेडकर, भदंत ज्ञानज्योती, भंते हर्षबोधी उपस्थित होते.
बुद्धिस्ट समन्वय संघ, महाराष्ट्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा. कवाडेही कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना आपले मत मांडण्यासाठी आयोजकांनी मंचावर आमंत्रित केले. माईक हाती धरताच सभागृहात उपस्थित आंबेडकरी अनुयायांनी कवाडे यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. गोंधळाकडे दुर्लक्ष करून कवाडे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मी भाषणासाठी येथे आलो नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र गोंधळ चांगलाच वाढला. घोषणाबाजीला जोर आला. लोकांचा विरोध पाहून त्यांना सभागृह सोडावे लागले.
काँग्रेस नेते अॅड. अक्षय समर्थ यांनी याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर हा प्रकार समोर आला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी आंदोलन पेटल्यानंतर सरकारचा निषेध म्हणून त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पीरिपाने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे महायुती सरकारमध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.
‘समाजाला सोबत घेऊन आंदोलन’
भंते विनाचार्यानी समाजाला सोबत घेऊन आंदोलन पुढे नेणार असल्याचे सांगितले. इतर भंतेगणांनीही रस्ता तसेच न्यायालयीन लढ्यात पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी विचारपीठावर भंते रेवत संघनायक भारत, भदंत ज्ञानज्योती, भदंत हर्षबोधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, भारतीय बौध्द महासभेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव आंबेडकर, सिने अभिनेता हिमांशू सोनी, दिल्लीचे माजी मंत्री राजेंद्रपाल गौतम, बसपाचे राष्ट्रीय समन्वयक जयप्रकाश आदी मान्यवरही उपस्थित होते.