नागपूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालवण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी संस्था स्थापन केल्याची माहिती ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर आहे.
महाज्योतीच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा नुकताच झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. मात्र, भूमिपूजन सोहळ्यातून याच विचारांना फाटा देण्यात आल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट या प्रकरणावरून महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्र्याच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमावर मिटकरींनी टीका केल्याने या प्ररकणाला नवीन वळण आले आहे.
महात्मा जोतिबा फुले यांनी संपूर्ण आयुष्य धार्मिक रूढी, परंपरा आणि कर्मकांडाच्या विरोधात लढा दिला. त्याचा विरोध म्हणून सत्यशोधक विवाह पद्धतीही सुरू केली. मात्र, त्यांच्याच नावाने असलेल्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) नवीन इमारतीचे भूमिपूजन वेदोक्त मंत्रोपचार पद्धतीने करण्यात आले. सामाजिक व ओबीसी संघटनांनी या कृतीचा निषेध केला आहे.
सदर परिसरामध्ये महाज्योतीची नवीन इमारत तयार होणार असून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या दरम्यान रितसर पुजारी बोलावून मंत्रोपचार पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. यासंदर्भातील छायाचित्र आणि माहिती समोर येताच सामाजिक संघटनांकडून विरोध सुरू झाला. ओबीसी युवा अधिकार मंचचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी या प्रकारचा तीव्र निषेध केला.
महात्मा फुले यांनी कायम कर्मकांडाचा विरोध केला व सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून बहुजन समाजाने यापासून दूर जावे, असा संदेश दिला. असे असतानाही फुल्यांच्या विचारावर चालणारी संस्थाच कर्मकांडाला पाठबळ देत असले तर हे संयुक्तिक नाही. यातून येणाऱ्या पिढीला आम्ही कुठला संदेश देतो, याचा प्रशासनाने विचार करावा. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही कोर्राम म्हणाले.
‘नकोच मध्यस्थी देव आणि भक्तांमध्ये’ असे सांगणाऱ्या महात्मा फुले यांच्या नावाने असणाऱ्या संस्थेच्या भूमिपूजन कार्यक्रमात मंत्रोपचार करणे म्हणजे फुल्यांनी आयुष्यभर केलेले प्रबोधन आणि त्यांचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.
मिटकरी काय म्हणाले?
आमदार मिटकरी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीच्या नागपूर येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन वेदोक्त मंत्रोच्चारात केल्या जात असले तर ही महात्मा फुलेंंची मरणोत्तर केलेली विलंबना होय. संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावे आपल्या याला गांभीर्याने घेऊन संबंधित आयोजकांवर कारवाई करावी.
इमारतीचे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास करणार असून भूमिपूजन कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था त्यांच्याकडे होती. त्यांनीच रुपरेषा आखली होती. त्यानुसार कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांचे सत्कार आणि इतर कामे आमच्याकडे होती. – मिलिंद नारिंगे, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती.
