अमरावती : माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या २ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानासमोर आंदोलन केले जाणार आहे. त्या ठिकाणी ‘अर्थभेद’ या सभेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, दिव्यांग यांना कसे डावलले गेले, याचा पाढा वाचला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांत शेतकरी कर्जमाफीवरून राजकारण ढवळून निघाले असताना शेतकरी, दिव्यांग आणि मजुरांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. ते राज्याच्या चारही विभागात आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले, २ जूनपासून आंदोलनाला सुरूवात होणार आहे. अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानासमोर आम्ही अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळाले, याचा जाब विचारणार आहोत. अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या वाट्याला किती रक्कम आली, हे आम्ही मांडणार आहोत.
बच्चू कडू म्हणाले, या आंदोलनानंतर ३ जून रोजी पंकजा मुंडे आणि ४ जून रोजी बाळासाहेब पाटील यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे. ५ जूनला संजय राठोड यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले जाईल. अमरावती विभागात हे आंदोलन होणार आहे, त्यामुळे हे आंदोलन यशस्वी करण्याची जबाबदारी ही प्रहारच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. यवतमाळ येथून आपण नागपूर येथे जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर मुक्काम केला जाईल. हमीभावाच्या २० टक्के बोनस देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्याला ७ हजारांचे ९ हजार द्यावे लागतील. सोयाबीनला ६ हजार आणि तुरीला ९ हजार रुपये प्रति क्विंटल इतके द्यावे लागणार आहेत. या घोषणेची आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली जाणार आहे.
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, कर्जमाफी देऊ, पण तारीख सांगत नाहीत. आम्ही वाट पाहत आहोत, तुम्ही तारीख सांगितली नाही, तर तुमच्या वाहनाचे चाक गायब केल्याशिवाय राहणार नाही, असा टोला देखील बच्चू कडू यांनी लगावला. ७ जूनपर्यंत आपण वाट पाहू, सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर ७ तारखेपासून आपण गुरूकूंज मोझरी येथे बेमुदत उपोषण सुरू करणार, असे बच्चू कडू यांनी सांगितले.