अमरावती : प्रहार शिक्षक संघटनेच्या बेमुदत उपोषण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शासनाच्या संच मान्यता शासन आदेशाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांच्यासह अकरा आंदोलनकर्त्या शिक्षकांना स्थानबद्ध करण्यात आले. आंदोलनकर्त्या शिक्षकांनी यावेळी घोषणा देत शासनाचा निषेध केला.
प्रशासनाने आंदोलनाची दाखल न घेतल्याने प्रहार शिक्षक संघटना कमालीची आक्रमक झाली असून कार्यवाही होत नसल्याने अखेर संघटनेने संच मान्यतेच्या शासन आदेशाची अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांना ताब्यात घेतले. प्रहार शिक्षक संघटनेचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयावर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजपासून अन्नत्याग आंदोलनाची भूमिका संघटनेने घेतली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालया समोर निदर्शने करीत शेकडो शिक्षकांनी शासन व प्रशासन विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करीत आपला रोष व्यक्त केला. या घोषणाबाजीने आयुक्त कार्यालय दणाणून सोडले. ग्रामीण शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारा व शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारा संच मान्यता दिनांक १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसह एकूण ३५ मागण्या शिक्षक संघटनेने केल्या आहेत.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी काल आंदोलनकर्त्या शिक्षकांनी रक्तदान करून शासनाचा व प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. प्रशासनाने दखल न घेतल्यास दिनांक १८ जून पासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने दिल्यानंतर व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची विभागीय आयुक्त त्यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा झाली. संघटनेची विभागीय आयुक्त कार्यालयात संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमक्ष बैठक घेण्याची सूचना बच्चू कडू यांनी केली. काल रक्तदान करणाऱ्या आंदोलनकर्त्यांमध्ये अमोल आगे, नागसेन रामटेक, अमोल वरेकर, अश्विन हिंगणकर, उमेश वानखडे, संदीप जाधव, अमोल हिरुळकर यांचा समावेश होता.
संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात अमोल आगे, मंगेश टिकार, अमोल वऱ्हेकर, नागसेन रामटेके, दिलीप इंगळे , नीलेश रसे, किरण वानखडे, अमोल हिरुळकर, शरद सदाफळे, नंदकिशोर धर्मे, राजू चव्हाण, सचिन शहाणे, उमेश वानखडे, रणजित दळवी, सुभाष खापरे, उमेश इंगोले, मनोज जवंजाळ , संतोष गजभिये, उमेश वानखडे, अनिल सातपुते, सफिक खान, नानाभाऊ मेटांगे आदी शिक्षक उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते.