अमरावती : नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीच्‍या (एनटीए) वतीने घेण्‍यात आलेल्‍या ‘जेईई मेन्‍स सत्र २’ च्‍या परीक्षेत येथील महर्षी पब्लिक स्‍कूलचा विद्यार्थी श्रेणिक मोहन साकला हा शंभर टक्‍के गुण मिळवून राज्‍यात अव्‍वल आला आहे. या परिक्षेत देशभरातून २४ विद्यार्थी अव्‍वल आले असून त्‍यात श्रेणिकचा समावेश आहे. ‘जेईई मेन्‍स सत्र २’ ची परीक्षा २५ ते ३० जुलैदरम्‍यान घेण्‍यात आली होती. या परीक्षेचा निकाल ‘एनटीए’ने आज जाहीर केला.

श्रेणिकची ‘आयआयटी’मधून पुढील शिक्षण घेण्‍याची इच्‍छा असून ‘कॉम्‍प्‍यूटर सायन्‍स’मध्‍ये आपल्‍याला उच्‍च शिक्षण घ्‍यायला आवडेल, असे श्रेणिकने सांगितले. श्रेणिकने सीबीएसई इयत्‍ता बारावीच्‍या परीक्षेत भौतिकशास्‍त्र आणि रसायनशास्‍त्रात ९९ टक्‍के तर गणितात ९८ टक्‍के गुण मिळवले होते. करोना संकटामुळे दोन वर्षांपूर्वी टाळेबंदी लागू करण्यात आल्‍यानंतर ऑनलाईन शिक्षणावर भर देण्‍यात आला. पण, त्‍यामुळे आपण विचलित झालो नाही. आपण नेहमी स्‍वयंअध्‍ययनाकडे लक्ष दिले. दिवसातून केवळ सहा ते सात तास अभ्‍यास केला. परंतु, या दरम्‍यान माझी एकाग्रता ढासळू दिली नाही. माझी धाकटी बहीण यावर्षी इयत्‍ता दहावीची परीक्षा देत होती. त्‍यामुळे घरातील वातावरणही अनुकूल होते. आमच्‍या आईने अभ्‍यासाच्‍या वेळेत लक्ष विचलित होऊ नये, याची काळजी घेतली, असे श्रेणिकने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेणिकचे वडील मोहन साकला हे शेतीव्‍यवसाय करतात. तेही बीएस्‍सी, एमबीए झाले आहेत. काही काळ त्‍यांनी खासगी नोकरीही केली. पण कौटुंबिक जबाबदा-यांमुळे त्‍यांनी नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील वडुरा या गावी स्‍वत:चा शेतीव्‍यवसाय करण्‍याचा निर्णय घेतला. श्रेणिकने आजवर कधीही अभ्‍यासाच्‍या बाबतीत सूचना देण्‍याची गरज भासू दिली नाही. तो स्‍वयंअध्‍ययन करीत होता. त्‍याच्‍या यशाचा आपल्‍याला आनंद झाल्‍याचे मोहन साकला यांनी सांगितले. श्रेणिकच्‍या यशाबद्दल शाश्‍वत कन्‍सेप्‍ट स्‍कूलचे संचालक अतुल गायगोले यांनी देखील आनंद व्‍यक्‍त केला असून श्रेणिकने इयत्‍ता दहावीपर्यंतचे शिक्षण ‘शाश्‍वत’मधून घेतले आहे. शाश्‍वत स्‍कूलने आपल्‍या अभ्‍यासाला योग्‍य दिशा दिल्‍याचे श्रेणिक म्‍हणाला.