नागपूर : बेधडक वक्तव्य करणारे नेते अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. परिणामांची पर्वा न करता वक्तव्यावर ठाम राहणारे गडकरी जितके जनमानसात लोकप्रिय आहेत, तितकेच राजकीय वर्तुळातही आहेत. पक्षाच्या पलिकडे जाऊन सर्वांची कामे ते करतात. त्यामुळे कट्टर विरोधक असलेल्या पक्षातही गडकरी यांचे आदराचे स्थान आहे. मात्र गडकरींच्या मतदारसंघातच एका व्यापाऱ्याची बोलता बोलता जीभ घसरली आणि त्यांनी चक्क गडकरींच्या बाबतीत जातीवाचक अर्वाच्च शब्दांत उल्लेख करीत त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली.

घराबाहेरच्या कंपाऊंडवॉलर लावलेल्या हिंदू देवी देवतांचे फोटो हटविण्यावरून काही हिंदुत्ववादी संघटांनी या महाशयांना फोटोमुळे धार्मिक भावना दुखावतात, त्यामुळे हे फोटो हटविण्याची विनंती केली. त्यामुळे हे महाशय भडकले आणि संतापाच्या भरात चक्क गडकरींना शिव्या देऊ लागले. झालेल्या प्रकाराचे चित्रिकरण करीत कोणीतरी हा व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकला. पाहता पाहता तो व्हायरल झाल्याने हिंदूत्ववादी संघटना भडकल्या आणि थेट लकडगंज पोलीस ठाण्यात पोचल्या. जातीवाचक शिविगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे लावून धरली.

याची कुणकूण लागताच संबंधित व्यापाऱ्याची पत्नी, साळा आणि भावाने लकडगंज पोलिस ठाणे गाठले. प्रकरण अंगलट येणार याची जाणीव झाल्याने या तिघांनीही शिवीगाळ करणाऱ्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगत माफीनामाही लिहून दिला. त्यामुळे हिंदूत्ववादी संघटना बॅकफूटवर आल्या. आमचा फक्त फोटोला विरोध होता. हिंदू देवी देवतांचे फोटो बाहेर लावू नका, इतकेच आम्ही सांगत होतो. शिवीगाळ करण्याची गरज नव्हती असे हिंदुत्ववादी संघटनांनी ठामपणे सांगितले. त्यावरही लेखी माफीनामा देऊन संबंधितांनी फोटो काढले जातील, असे सांगितले.

नेमका कुठे घडला प्रकार

महाल परिसरातल्या दारोडकर चौकाजवळच्या एका गल्लीत २५ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. गुप्ता नावाचे वकील आणि सीए भाऊ भाऊ असलेल्या कुटुंबातील एकाने घरासमोर लोक कचरा टाकतात, लघूशंका करतात म्हणून भिंतीवर बाहेरच्या बाजूने हिंदू देवी देवतांचे फोटो लावले. मात्र कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी हिंदू देवी देवतांच्या फोटोंमुळे धार्मिक भावना दुखावत असल्याने हे फोटो काढून घ्या अशी विनंती पांडे नावाचे व्यक्तीने गुप्ता यांच्याकडे केली. मात्र त्यांच्याशीही असभ्य वागत जीभ घसरलेल्या गुप्ता यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनाच जातीयवाचक शिवीगाळ केली.

इतके होऊनही पांडे हे त्यांना समजावून सांगत होते. तरीही गुप्ता यांची जीभ घसरली. त्याने चक्क केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा थेट उल्लेख करीत अर्वाच्च भाषाही वापरली. हा सगळा प्रकार सुरू असताना विशिष्ट समाजावर शिंतोडे उडविणाऱ्या शिवीगाळीचे कोणीतरी चित्रिकरण केले आणि ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले. पाहता पाहता प्रचंड व्हायरल झालेली ही चित्रफित पाहून हिंदूत्ववादी संघटना संतापल्या आणि त्यांनी लकडगंज पोलिस ठाणे गाठत संबंधीत भावंडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याची कुणकूण लागताच गुप्ता यांचे बंधू,पत्नी आणि साळ्याने लकडगंज पोलीस ठाणे गाठले. पतीचे मानसिक संतुलन बिघडले असून मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचारही सुरू असल्याने त्यांनी माफिनामा लिहून दिला. पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची हमी दिली. त्यामुळे तुर्तास प्रकरण शमले. मात्र सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पोलीस यावर काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.