काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी उत्तर प्रदेशमध्ये डिपॉझिट जप्त झालेल्या इम्रान खान उर्फ प्रतापगडी यांना काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल नाराज व्यक्त केली. माजी आमदार डॉ. अशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त करताना आपल्या काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा राजीनामाही दिला आहे. ते मंगळवारी (३१ मे) नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

उत्तर प्रदेशातून काँग्रेसचे केवळ दोन आमदार निवडून आले. अशा राज्यातून प्रतापगडी, राजीव शुक्ला आणि प्रमोद तिवारी अशा तीन नेत्यांना राज्यसभेवर पाठवणे हे कितपत योग्य आहे असा सवालही आशिष देशमुख यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्ष श्रेष्टींच्या अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात मी महासचिव पदाचा राजीनामा देत आहे असे मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

आशिष देशमुख म्हणाले, “मी माझ्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. महाराष्ट्रात अतिशय कर्तबगार आणि काँग्रेसला रिझल्ट देऊ शकतात असे नेते उपलब्ध आहेत. असं असताना एका बाहेरील उत्तर प्रदेशच्या व्यक्तीला इम्रान खान उर्फ इम्रान प्रतापगडी या नवख्या व्यक्तीला महाराष्ट्रात लादण्यात आलंय. त्यांना काँग्रेसच्या वतीने राज्यसभेची उमदेवारी देण्यात आलीय. या निर्णयाच्या निषेधार्थ मी माझ्या महासचिव पदाचा राजीनामा देत आहे.”

“मी राजीनामा देत असलो तरी काँग्रेसमध्ये राहणार आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातूनच जनतेची सेवा करणार आहे,” असंही आशिष देशमुख यांनी नमूद केलं.

“काँग्रेसच्या नेत्यांना कव्वाली, शायरी आणि मुशायरी करणं शिकवलं पाहिजे”

आशिष देशमुख पुढे म्हणाले, “इम्रान प्रतापगडी यांचं एकच क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे ते कव्वाल आहेत, शायर आहेत आणि मुशायरे करतात. म्हणून शिर्डीतील प्रदेश काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात एक वर्कशॉपमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना कव्वाली करणं, शायरी करणं आणि मुशायरी करणं शिकवण्यात आलं पाहिजे. ते शिकवण्यासाठी इम्रान प्रतापगडी महाराष्ट्रात आले तर नक्कीच आनंद होईल.”

हेही वाचा : “एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाचं काय झालं?”; चिदंबरम यांच्यावरून काँग्रेसमध्ये धुसफूस

आशिष देशमुख यांनी भाजपाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हा पक्षश्रेष्ठींकडून काही आश्वासन दिलं होतं का या प्रश्नावर आशिष देशमुख म्हणाले, “दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांनी स्वतः मला राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आश्वासन दिलं होतं. मी १५ दिवसांपूर्वी देखील भेटलो होतो तेव्हा देखील त्यांनी दिलेलं आश्वासन लक्षात आहे, काळजी करू नका असं म्हटलं होतं.”

“असं असताना देखील एका नवख्या आणि बाहेरील उमदेवाराला महाराष्ट्रावर लादण्याचं काम झालंय. या संबंधात सोनिय गांधींवर इतर कोणाचा दबाव होता का, या दबावाखाली असे अनेक निर्णय चुकत चालले आहेत. पक्षाची हानी होत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

आशिष देशमुख म्हणाले, “महाराष्ट्रातील एखाद्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अजून बळकटी देण्यासाठी मदत झाली असती. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे केवळ दोन आमदार निवडून आले आणि तेथील तीन जणांना राज्यसभेवर पाठवलं जात आहे. या निर्णयामुळे माझ्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो की उत्तर प्रदेशमध्ये जी काँग्रेसची परिस्थिती आहे तशी परिस्थिती महाराष्ट्रात करायची आहे का? यासाठी कट रचला जात आहे का हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांसमोर आहे.”