RSS Centenary Celebration: नागपूर : विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक उत्सवात भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित राहून ऐतिहासिक दस्तऐवजांचा संदर्भ देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांच्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसंग उजेडात आणला. ९ जानेवारी १९४० रोजी महाराष्ट्रातील कराड (जि. सातारा) येथील संघ शाखेला भेट देतांना डॉ. आंबेडकर यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला व आपुलकीची भावना व्यक्त केली, असे कोविंद यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या भेटीत डॉ. आंबेडकर यांनी संघ कार्यकर्त्यांना आवश्यक असल्यास मदतीचा प्रस्ताव दिला होता. हे विधान त्या काळातील ‘जनता’ या साप्ताहिकात तसेच ‘केसरी’ या मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. कोविंद यांनी सांगितले की, “ही घटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता आणि समावेशकतेच्या विचारसरणीचे प्रमाण आहे.” त्यांच्या मते, डॉ. आंबेडकर आणि संघ यांच्यातील ही ऐतिहासिक भेट भारतीय समाजाच्या एकात्मतेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा होती.
या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील भाषण करत समाजामधील समतेचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी भारताच्या सांस्कृतिक एकतेवर भर दिला आणि सांगितले की, “समाजातील सर्व घटकांनी परस्पर आदर, समज आणि सहकार्याने पुढे जावे, हीच खऱ्या अर्थाने विजयादशमीची शिकवण आहे.”
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पारंपरिक शस्त्रपूजा, संघ संचलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. नागपूरच्या रेशीमबाग मैदानात झालेल्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिकांनी उपस्थिती लावली.
रामनाथ कोविंद यांच्या या भाषणामुळे इतिहासातील एक महत्वाचा पैलू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डॉ. आंबेडकर आणि संघ यांच्यातील संबंधावर आजवर फारसे प्रकाश टाकले गेले नसले, तरी कोविंद यांच्या भाषणामुळे हा विषय नव्याने अभ्यासला जाण्याची शक्यता आहे. तसेच नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.