नागपूर: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणावर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संतापली आहे. पक्षातर्फे नागपुरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठवले गेले आहे. त्यात दोषींवर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केली गेली आहे.

नागपुरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाद्वारे राष्ट्रपतींना निवेदन दिले गेले. हे निवेदन नागपूरचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवले गेले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे म्हणाले, ६ ऑक्टोंबरला सर्वोच्च न्यायालयात वकिल राकेश किशोर नावाच्या एका जातीयवादी मानसिकतेच्या वकिलाने भूषण गवईवर हल्ला केला. न्यायालयातील हा हक्का भूषण गवई यांच्यावर नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेवर आहे. या कृत्यामुळे जगात भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन झाली.

हा गुन्हा अक्षम्य आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करीत देशद्रोहचा खटला दाखल करावा. सोबत गवई यांच्या सुरक्षेत वाढ करावी. कट्टर धर्मांध आणि संविधान न मानणाऱ्या लोकांकरिता कठोर कायदा करावा. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे, महासचिव प्रशांत ढेंगरे, कार्याध्यक्ष क्षितीज गायकवाड, नानाजी ढेंगरे, ऋषी मुन, गोपीचंद अंभोरे, राजेश ढेंगरे आणि इतरही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

घटना काय ?

सोमवारी (६ ऑक्टोंबर २०२५) सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला. तेव्हा सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी आरोपी असलेला वकील डेस्कवर गेला, त्याने त्याचा बूट काढला आणि सरन्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि घेऊन गेले.

कोणी काय प्रतिक्रिया दिली ?

सरन्यायाधीशांवरील हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत लिहले, या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशातील प्रत्येक नागरिक संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ही घटना निषेधार्ह आहे. अशा परिस्थितीला तोंड देताना न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या शांततेचे मी कौतुक करतो. त्यांचे कृत्य न्यायमूर्तींच्या मूल्यांप्रती आणि आपल्या संविधानाच्या आत्म्याला बळकटी देण्याप्रती त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी निषेध केला. खासदार राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत लिहले, सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला हा आपल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि संविधानाच्या मूलभूत भावनेवर हल्ला आहे. आपल्या देशात अशा द्वेषाला स्थान नाही आणि या घटनांचा निषेध केलाच पाहिजे.