यवतमाळ : राज्य सरकारच्या खोट्या घोषणा, अंमलबजावणीशून्य योजनांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पदयात्रा आरंभली आहे. त्यांच्या ‘सातबारा कोरा’ पदयात्रेचा सातवा दिवस सोमवारी अंबोडा येथे ऐतिहासिक सभेत रूपांतरित होईल, असा विश्वास प्रहारने व्यक्त केला आहे. याठिकाणी हजारो शेतकरी हातात लाठ्या, काठ्या व रूमणे घेऊन सभेसाठी एकवटत असल्याचे चित्र आहे.
७ जुलै रोजी भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ (जि.अमरावती) येथून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यासाठी पदयात्रेला सुरुवात केली आहे. पापळ येथून ही पदयात्रा उंबरडा बाजार, मानकीमार्गे वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज येथून महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे पोहोचणार आहे. १३८ किलोमीटर प्रवासाचा टप्पा गाठण्यासाठी मागील सहा दिवसांपासून कडू हे शेतकऱ्यांच्या समुदायाला एकवटून मार्गस्थ झाले आहेत.
सरकारनं डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यांना ना शेतकऱ्यांचं दुःख दिसतं, ना दिव्यांगांची वेदना. आम्ही त्यांचे डोळे उघडण्यासाठी रस्त्यावर उतरलो, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यात्रेदरम्यान दिली. सातबारा कोरा केला जावा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, दिव्यांगांना सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जावे, याशिवाय मेंढपाळ, मच्छीमारांच्या विविध प्रश्नांना घेऊन आंदोलन पुकारले आहे.
यात्रेत राज्यभरातून हजारो शेतकरी सहभागी होत असून उद्या १४ जुलै रोजी ही यात्रा अंबोडा येथे धडकणार असून आयोजित सभेतून शासनाचे लक्ष वेधून घेतले जाणार आहे. देशातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या चिलगव्हाण येथे यात्रेचा समारोप होणार असून पावसातही या यात्रेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढतीवर आहे.
या यात्रेत सहभागी झालेल्या शेकडो शेतकरी व दिव्यांग बांधवांनी डोळ्यांवर काळी पट्टी बांधून, हातात विळा व रूमणे घेऊन अंबोड्याकडे प्रस्थान केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि दिव्यांगांच्या न्यायासाठी सुरू असलेलं हे प्रतीकात्मक आंदोलन समाजाचं लक्ष वेधून घेत आहे. राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या या चळवळीला आता राजकीय आणि सामाजिक पाठिंबा लाभत आहे. या सभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील, तसेच महाराष्ट्र भूषण सत्यपाल महाराज उपस्थित राहणार आहेत.
पोलीस पाटलांचे दबावाचे राजकारण?
यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांमध्ये पोलीस पाटील व स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्रहारने केला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना धमक्या देऊन दबाव टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, शासनाच्या धोरणाला त्रस्त झालेले शेतकरी कोणत्याही दबावाला बळी न पडता रस्त्यावर उतरल्याचे चित्र या पदयात्रेत दिसत आहे.