अमरावती : सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सहा लाख माय माऊल्यांचा सिंदूर पुसला गेला. तो सिंदूर सरकार का विसरले? त्याच माय माऊलीच्या कपाळावरील पुसल्या गेलेल्या सिंदुराची आठवण करून देण्यासाठी आम्ही रामटेक ते दीक्षाभूमी (नागपूर) ‘सिंदूर यात्रा’ काढणार, दुसरी यात्रा मराठवाड्यात, हिंगोली ते नांदेड काढणार आहोत, अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारला सद्बुद्धी यावी, अशी प्रार्थना करण्यासाठी गावागावात फिरता गणपती बसवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली येथे शेतकरी आत्मचिंतन बैठक आणि रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी बच्चू कडू म्हणाले, येत्या २ ऑक्टोबरला गांधीगिरी विसरून भगतसिंगगिरी सुरू होईल. गावागावातून ट्रॅक्टर मोर्चे निघतील. ही शेतकऱ्यांची क्रांती असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का दिली जात नाही? याचे स्पष्ट खुले उत्तर द्यावे, नाहीतर पुढचा टप्पा सरकारसाठी घातक ठरेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
बच्चू कडू यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही टीका केली. बावनकुळे हे आमच्या आंदोलनाला स्टंटबाजी म्हणतात. इथे शेतकरी रोज पाय घासून घासून मरतोय, रोज संसार उद्ध्वस्त होतोय, आणि तुम्हाला ती स्टंटबाजी वाटते? शेतकऱ्यांबद्दल अशा भावना व्यक्त करताना काहीच कसे वाटत नाही. विधिमंडळाच्या सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची काय जाण असणार? प्रशासन मुजोर झाले आहे. पंचनामे होत नाहीत, आदेश निघत नाहीत, आणि सरकार केवळ थापा मारत आहे. आमचे शेतकरी रक्तदान करताहेत, पण सरकारचे मन अजूनही काळे आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
बच्चू कडू म्हणाले, श्रीकृष्णाने कालिया नागाला ठेचले होते, आम्ही आता शेतकऱ्यांना गिळणाऱ्या सरकारच्या धोरणाला ठेचणार आहोत. राजकीय नाकर्तेपणाला, ढोंगी घोषणांना, आणि फसव्या हमीभावाला आता महाराष्ट्रातील शेतकरी कधीच माफ करणार नाही.
बच्चू कडू म्हणाले, सहा लाख हिंदू मातांनी, बहिणींनी आपले सिंदूर गमावले, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक शब्द बोलत नाहीत. श्रद्धांजली तरी द्यावी, एवढेही त्यांच्या मनात येत नाही.