अमरावती : काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी शनिवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वरूड येथे आयोजित कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार रामदास तडस, आमदार उमेश यावलकर, आमदार राजेश वानखडे आदी उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका होऊन सात महिने झाले, लोकसभा निवडणूक १४ महिन्यांपूर्वी झाली. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात २ कोटी ५० लाख मते मिळाली. त्यांचे ३१ खासदार निवडून आले. भाजप, महायुतीला त्यावेळी २ कोटी ४८ लाख मते प्राप्त झाली. महाविकास आघाडीला दोन लाख मते जास्त मिळाली. आमचा पराभव झाला. तेव्हा आम्ही काही बोललो का? आम्ही पराभव स्वीकारला. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो. आम्ही अडीच कोटी लाडक्या बहिणींसाठी योजना आणली, त्यांच्याकडे आम्ही गेलो. ४५ लाख शेतकऱ्यांचे विजेचे बिल आम्ही माफ करून दिले.
पुढची पाच वर्षे वीज बिल देणार नाही, असेही सांगितले. पुढच्या पाच वर्षांमध्ये योजनेच्या पैशांमध्ये वाढ केली जाईल, असे आम्ही लाडक्या बहिणींना सांगितले. आम्ही लोकांच्या मनात काय आहे, ते हेरले आणि ४० ते ४५ नवीन योजना सुरू केल्या. परिणामी विधानसभा निवडणुकीत भाजप, महायुतीला ३ कोटी १७ लाख मते मिळाली. आमच्या मतांमध्ये ६९ लाख मतांची वाढ झाली आणि काँग्रेस, महाविकास आघाडीची मते ही २ कोटी ५० लाखांवरून २ कोटी १७ लाख मतांवर आली, म्हणजे ते ३३ लाख मतांनी उणे झाले. हा आमचा दोष आहे का, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मला काँग्रेस पक्षातील नेत्यांची कीव येते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा कुणी मतदार यादीवर आक्षेप घेतला नाही. प्रत्यक्ष मतदान झाले, त्यावेळीही कुणी आक्षेप नोंदवले नाहीत. जेव्हा लोकसभेत त्यांचे जास्त खासदार निवडून आले, तेव्हा ते काही बोलले नाहीत. आता सात महिन्यांनंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे मतदार यादी चुकीची आहे, हे सांगताहेत. हा लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसची ही नौटंकी फार काळ चालणार नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस शून्यावर आणण्याचा संकल्प सर्वांनी केला पाहिजे.