भंडारा : मागील आठवड्यात तुमसर तालुक्यातील एका देह व्यापार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी कारवाई केल्याची घटना ताजी असताना आज पवनी तालुक्यातील एका लॉजवर सुरू असलेल्या देहव्यवसायावर पोलिसांनी धाड टाकली. दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. यामुळे खळबळ उडाली आहे.
सध्या सण-उत्सवांच्या दरम्यान पोलिसांची गस्त सुरू आहे. जास्ती दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. इटगाव- कुर्झा मार्गावरील श्री व्यंकटेश लॉज अॅड हॉटेल मध्ये अवैधरित्या देहव्यवसाय चालविला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला.बनावट ग्राहक म्हणून या लॉजवर एका व्यक्तीला पाठवण्यात आले. त्यावेळी लॉज मालक एका महिलेकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापेमारी करत देह व्यापार करणाऱ्या रॅकेट उघड करीत दोन आरोपींना अटक केली आहे. लॉजवर असलेला मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला.
भंडारा जिल्हा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. पवनी पोलीस ठाणे परिसरात असलेल्या एका लॉजवर अवैधपणे देह विक्री व्यवसाय चालविला जात होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत ही कारवाई केली आहे. याठिकाणाहून अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजय नागेश्वर (वय २६, बेलाटी, ता. लाखांदूर) आणि लॉज मालक व्यंकटेश बागडे (४४, साकोली) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात दहशतवाद विरोधी शाखा भंडारा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी, सहाय्यक फौजदार गभणे, पोलीस शिपाई सरवटे यांनी केली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन पवनीचे अधिकारी करीत आहेत.