Ganeshotsav 2025: भंडारा : ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक सुरक्षा लक्षात घेता गणेशोत्सवात मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्याचे आदेश भंडारा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी दिले आहेत.

उल्लंघनावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. असे असताना भंडारा नगर परिषदेने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला डावलून मोठ्या आवाजात डीजेच्या तालावर ठेका धरला. गणेश विसर्जन मिरवणुकीत नगर परिषदेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याने चर्चांना उधाण आले आहे. गणेशोत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी मोठ्या भक्तीभावाने बाप्पाची स्थापना केली जाते. भंडारा नगरपालिकेने देखील पाच दिवसांच्या गणपतीची नगर परिषदेत प्रतिष्ठापना केली.

कर्मचाऱ्यांनी स्थापित केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन १ सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात पार पडले. मात्र विसर्जन मिरवणुकीतील कानठळ्या बसविणाऱ्या डीजेचा आवाज नागरिकांमध्ये प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आदेशानंतरही भंडारा नगरपरिषद त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याने सर्वत्र टिकेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. विसर्जनाच्या दिवशी भर पावसात भल्या मोठ्या आवाजातल्या डीजेच्या तालावर कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब उत्साहाने नाचत होते. विशेष म्हणजे या मिरवणुकीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी देखील उपस्थित होते आणि ते ताल धरून लोकांना जल्लोष करताना दिसले.

आता दहा दिवसांनी शहरातील इतर सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत जेव्हा नगरपालिकेने स्वतः आवाजाशी संबंधित नियमांचे पालन केले नाही तर इतर मंडळांनी नियम भंग केल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्याचे कोणते अधिकार त्यांना राहतील असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिरवणुकीत अग्निशमन विभागाच्या वाहनांचेही प्रदर्शन करण्यात आले होते. तथापि, कोणत्याही वास्तविक कारणाशिवाय वाहनांचा वापर केवळ दिखाव्यासाठी करण्यात आला, ज्यामुळे हा कार्यक्रम केवळ दिखावा वाटल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. शेकडो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी यात भाग घेतला.

शहराची चर्चा बनली

उत्सवांमध्ये आनंद महत्त्वाचा असतो परंतु आवाजाची मर्यादा राखणे आणि नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर नगरपालिकाच नियम मोडत असेल तर इतर मंडळांकडून काय अपेक्षा करता येईल? यामुळेच ही मिरवणूक संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली आहे आणि भविष्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये आवाज आणि नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

नगरपरिषदेवर काय कारवाई होणार?

जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा आखून दिलेली असताना नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी जर त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर पोलीस अधीक्षक काय कारवाई करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी नगरपरिषदचे मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांना संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.