scorecardresearch

पुरातत्त्व स्थळांच्या महसुलात मोठी घट! ; सर्वाधिक पर्यटकांची वेरुळ लेणी, बीबी का मकबराला भेट

राज्यातील पुरातत्त्व स्थळांच्या महसुलात करोनामुळे मोठी घट नोंदवली. माहितीच्या अधिकारात भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या स्मारक शाखेने दिलेल्या गेल्या तीन वर्षांच्या महसुलाच्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.

महेश बोकडे

नागपूर : राज्यातील पुरातत्त्व स्थळांच्या महसुलात करोनामुळे मोठी घट नोंदवली. माहितीच्या अधिकारात भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या स्मारक शाखेने दिलेल्या गेल्या तीन वर्षांच्या महसुलाच्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. राज्यातील सर्वाधिक पर्यटकांनी वेरुळ लेणी आणि बीबी का मकबरा या दोन स्थळांना भेट दिल्याचेही यातून समोर आले आहे.  वेरुळ लेणीला २०१९-१९ या वर्षांत ६ कोटी ३९ लाख ५१ हजार ३० रुपये, २०१९- २० मध्ये ६ कोटी २९ लाख ८५ हजार ९५५ रुपये महसूल मिळाला. २०२०- २१ या करोना काळात मात्र केवळ ६२ लाख ७६ हजार २४० रुपये महसूल मिळाला. औरंगाबादेतील बीबी का मकबरा येथे २०१८-१९ मध्ये २ कोटी ९५ लाख २० हजार १५ रुपये, २०१९-२० मध्ये ३ कोटी ५ लाख ८० हजार ९७० रुपये तर २०२०-२१ मध्ये केवळ ४९ लाख ४६ हजार ६१० रुपये महसूल मिळाला.

पुण्याच्या शनिवारवाडा येथे २०१८-१९ मध्ये २ कोटी ९१ लाख २ हजार ४९५ रुपये, २०१९-२० मध्ये ३ कोटी ४ लाख ६४ हजार ५६० तर २०२०-२१ मध्ये ३९ लाख ६४ हजार १८० रुपयांचा महसूल मिळाला. एलिफंटा लेणीला २०१८-१९ मध्ये ४ कोटी ९० लाख ३९ हजार २६०, २०१९-२० मध्ये ५ कोटी १५ लाख ९० हजार ५४ रुपये, २०२०-२१ मध्ये ३४ लाख १७ हजार ६४५ रुपयांचा महसूल मिळाला. जंजीरा किल्ला, मुर्द येथे २०१९-२० मध्ये ६४ लाख २ हजार ६२५ रुपये, २०२०-२१ मध्ये ३७ लाख रुपयांचा महसूल मिळाला. अजिंठा लेणी येथे २०१८-१९ मध्ये २ कोटी ६१ लाख ९४ हजार २६० रुपये, २०१९-२० मध्ये २ कोटी ६ लाख ३९ हजार ४८०, २०२०-२१ मध्ये १८ लाख ८२ हजार ३८५ रुपयांचा महसूल मिळाला. इतरही पर्यटन स्थळावर करोना काळात पुरातत्त्व विभागाला कमी महसूल मिळाल्याचे माहितीच्या अधिकारातून भोपाळचे सामाजिक कार्यकर्ते आशीष कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

नागपूर विभागात सर्वात कमी 

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, नागपूर विभागातील गाविलगड किल्ल्याला २०१९-२० मध्ये १० लाख ९७ हजार ७२५ रुपयांचा महसूल मिळाला. २०२०-२१ मध्ये हा महसूल केवळ १०० रुपयांवर आला. तर प्राचीन बौद्ध अवशेषांमध्ये मॉन्स्ट्री स्तूप, शिलाशिल्प, शिलालेख इ. मानसरच्या स्थळावर २०१९-२० मध्ये ५९ हजार ४०० रुपये महसूल मिळाला. ही संख्या २०२०-२१ मध्ये केवळ १६० रुपये इतकी होती.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Big drop revenue archeological sites tourists visit ellora caves bibi ka makbara ysh

ताज्या बातम्या