मोहन अटाळकर, लोकसत्ता

अमरावती : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर लगेच भाजपाने विधानपरिषदेसाठी अमरावतीकर असलेले श्रीकांत भारतीय यांना संधी दिली आहे. या निर्णयानंतर भाजपाने पश्चिम विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाने जिल्ह्यातील दोन नेत्यांना अचानकपणे राज्यसभा, विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यामागे आगामी निवडणुकांच्या गणितांची जुळवाजुळव असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा >> भाजपाचा पाचवा उमेदवार कोण ? पाचव्या उमेदवारामुळे विधानपरिषद निवडणूकीमध्ये चुरस

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपामधील अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती. पण त्यांना डावलून श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्रीकांत भारतीय हे मूळचे अमरावतीकर असले तरी त्यांचा वावर स्थानिक पातळीवर कमी राहिलेला आहे. राज्यात युतीची सत्ता असताना ते प्रदेश पातळीवरील राजकारणात अधिक सक्रिय झाले.

हेही वाचा >> “सभा संभाजीनगरमध्ये असूनही मुख्यमंत्र्यांचं पूर्ण लक्ष मुंबईत असेल, कुठला आमदार…”, निलेश राणेंचा खोचक टोला!

गेल्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यावर भाजपामध्ये चिंतन झाल्यानंतर राजकीय कारणांसह जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे झुकलेल्या कुणबी-मराठा, ओबीसी समाजाला भाजपकडे आकृष्ट करण्याची रणनीती ठरविण्यात आली. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून डॉ. बोंडे यांना राज्यसभेची तर श्रीकांत भारतीय यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. हे दोन उमेदवार निवडून आल्यानंतर जिल्ह्यात भाजपाचा एक खासदार आणि तीन आमदार असे चित्र असेल.

हेही वाचा >> बारावीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा; अपयशी विद्यार्थ्यांचे वाढवलं मनोबल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावती तसेच पश्चिम विदर्भात भाजपाच्या पाठीशी मोठा वर्ग आहे. विशेषत: ब्राह्मण समाजामध्ये आपल्याला डावलण्यात येत असल्याची चर्चा सुरू होती. ही नाराजी वाढू नये, याची दक्षता घेण्याचा प्रयत्न भाजपमध्ये सुरू झाला. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पक्षसंघटनेतील आणि ब्राम्हण समाजातील अशी दोन्ही सूत्रे श्रीकांत भारतीय यांच्या उमेदवारीतून पाळली गेल्याचे दिसून आले आहे. पश्चिम विदर्भात पक्षाचा जनाधार वाढवितानाच पारंपरिक मतदारांना एकसंध ठेवण्याचाही भाजपाचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.