वर्धा : भाजपची विदर्भस्तरीय बैठक २८ जुलै रोजी सेवाग्राम येथे होत आहे. मुख्यमंत्री, राज्यस्तरीय नेते, मंत्री, खासदार, आमदार व अन्य बडी मंडळी यांची हजेरी या ठिकाणी लागणार. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे चित्र आहे. त्यांचे पट्टशिष्य आमदार सुमित वानखेडे यांनी केलेले वक्तव्य हे त्यामागचे कारण.
गांधीवादी संस्थांमध्ये माओवादी समर्थकांचा शिरकाव व त्यापासून सावध राहण्याचा त्यांनी दिलेला ईशारा हा गांधींवाद्यांना अस्वस्थ करून गेला. त्याची प्रतिक्रिया संतप्त स्वरूपात उमटली. निषेध झाला. थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून, आरोपसिद्ध करा अन्यथा दिलगिरी व्यक्त करा, असे आव्हान देण्यात आले. शेवटी गांधींभूमीच चिंतन करण्यासाठी भेटली, असा टोला पण आता लगावल्या जात आहे.
महात्मा गांधी यांचा आश्रम व सोबतच अन्य गांधीवादी संस्थांचे मोहोळ सेवाग्रामात असल्याने देश विदेशातील गांधीवादी कार्यकर्त्यांसाठी सेवाग्राम हे स्थळ त्यांच्या राजधानी समान असल्याचे म्हटल्या जाते. गांधीवादी व भाजप हे टोकाचे परस्पर विरोधक असल्याच्या पार्श्वभूमीवर व त्यातच माओवादी समर्थकांचा शिरकाव झाल्याचा आरोप, याचे सावट बैठकीवर पडले आहे. त्याची दखल मुख्यमंत्री फडणवीस आपल्या भाषणात घेत परत गांधीवादी मंडळीस चिमटा घेणार की, दिलगिरी व्यक्त करणार, याकडे लक्ष लागले आहे.
सेवाग्राम आश्रमास अनेक भाजप नेत्यांनी भेट देत अभिवादन केलेले आहे. भाजप अध्यक्ष असतांना विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी तर राष्ट्रीय किसान मोर्चाची सुरवात करण्यास सेवाग्राम निवडले होते. वावडे विचाराचे, विचार स्थळाची पूण्याई मात्र हवीशी, असे हे भाजपचे सेवाग्रामशी नाते राहल्याचा इतिहास आहे. शस्त्रपूजनच नव्हे तर लाठीसह प्रशिक्षण देणारे अंगावर निमूटपणे लाठ्या झेलण्याचा इतिहास राखून असलेल्यांवर आरोप करतात, हे अनाकलनीय. मात्र गांधीभूमीत सर्वांचे स्वागतच, अशी भावना गांधीवादी पदाधिकारी अविनाश काकडे व्यक्त करतात.
पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी बैठकीसाठी चरखा भवनाची निवड केली. हे भवन पण सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अखत्यारीत. १५ दिवसापूर्वीच पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच स्थळी घेऊन आले. अद्याप जागतिक स्तरावर बातमीमूल्य टिकवून असणाऱ्या सेवाग्रामात कार्यक्रम असला तर कार्यक्रमास साधनसुचितेचे आयतेच कोंदण लाभते, हे चतुर पालकमंत्री ओळखून आहे. भलेही आम्ही आरोप करीत संशयकल्लोळ नाटकाचा प्रयोग करणार, पण पुण्याईचा लाभ मात्र सोडणार नाही, अशी चलाखी ही मंडळी दाखवीत असल्याचे गांधीवादी म्हणतात.
मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसह विदर्भातील भाजपचे सर्व मंत्री, पालकमंत्री डॉ. भोयर,ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मूनगंटीवार, सर्व आमदार व खासदार, संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर व जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली. माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खासदार रामदास तडस, नीलेश किटे यांनीही बैठकबाबत माहिती दिली.