नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ( शरद पवार)काळी दिवाळी साजरी करण्यात आली.या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सरकारचा चुकीचे धोरण यांच्याकडे सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील शेतकऱ्यांना या वर्षी दिवाळीचा सण अंधारात साजरा करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) नागपूर शहरात आक्रमक झाली आहे. पक्षाच्या वतीने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत धरणे देण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पैठे यांनी केले. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उपस्थिती होती. आंदोलकांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणे, संजय गांधी निराधार योजनेतील थकीत रक्कम त्वरित जमा करणे आणि शेतीमालाला हमीभाव देण्याची मागणी केली.
जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींनी दिवाळीचा सण काळ्या दिवसाप्रमाणे साजरा करत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी ५०,००० रुपये मदत, संत्रा व मोसंबी बागायतदारांना नुकसानभरपाई, पीक विमा योजनेतील सुधारणा, कापूस आयात शुल्क पुन्हा लागू करणे आणि सोयापेंडची निर्यात वाढवण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा यांचा समावेश होता.
शेतकऱ्यांनी सांगितले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारकडून जाहीर मदत अपुरी आहे. पीक विमा निकष कठीण असून त्यात सुधारणा गरजेच्या आहेत. शिवाय, कापूस व खाद्यतेलाच्या आयातीमुळे देशांतर्गत शेतीमालाचे भाव कोसळत असून, यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती.
‘मुख्यमंत्री मुर्दाबाद’, ‘पालकमंत्री मुर्दाबाद’, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून त्यांनी ते राज्य व केंद्र सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामध्ये वेदप्रकाश आर्य, शैलेन्द्र तिवारी, अशोक काटले, महेंद्र भांगे, राजूसिंग चौहान, रवीनिश पांडे, पंकज ठाकरे, अनिल बोकडे, डॉ. मिलिंद वाचनेकर, अविनाश गोतमारे, सुरेश गुडधे पाटील, रेखा कृपाले, राकेश गांधी, देवेंद्र घराडे, वर्षा शामकुळे, सनी व्यास, बबिता सोमकुवर, संगीता खोब्रागडे, प्रवीण कुंटे पाटील, अनिल साठवाने, सुभाष नासरे, चंद्रशेखर कोल्हे, गणेश सावरकर, अशोक राऊत, धनंजय देशमुख, अमित जेठे, नंदकिशोर माते, गोपाल ठाकूर, बलराम मनुजा, सारंग साकरे, जतिन झाडे, अभिषेक गठिबंधे, गौरव गजघूमे आदींचा समावेश होता.