बुलढाणा : व्यवसायिकाची रेकी करून व पाळत ठेऊन त्याला निर्मनुष्य ठिकाणी लुटण्याचा कट करणाऱ्या मराठावाड्यातील सुसज्ज टोळी ला बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगारी टोळीचा कट उधळून लावतानाच पिस्तूल, काडतूस, चाकू देखील जप्त केले आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी दोन पथक मराठवाड्यात रवाना करण्यात आले आहे.

बुलढाणा तालुक्यातील बिरसिंगपूर शिवार मध्ये नारायण सिनकर यांचा बालाजी इंडस्ट्रिज नावाने तेलाचा व्यापार आहे. दररोजच्या उलाढाल मधून मिळणारी मोठी रक्कम ते रात्री एकाच रस्त्याने आणिविशिष्ट वेळेवर ते बुलढाणा स्थित घरी आणतात. या पाच जणांच्या टोळीने रेकी करून त्यांच्यावर पाळत ठेवली. त्यांची अधिक माहिती घेऊन त्यांना रस्त्यात निवांत ठिकाणी अडवून त्यांची रक्कम लुटण्याची योजना टोळीने आखली. याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बुलढाणा अजिंठा राज्य मार्गावर सापळा रचला. रात्री उशिरा मार्गावरील कृषी विज्ञान केंद्र जवळ टोळीला पथकाने ताब्यात घेतले.

पाच जणांच्या टोळीकडून एक पिस्तूल, जिवंत काडतूस, दोन लोखंडी धारधार चाकू, दोन दुचाकी, दोन मोबाईल असा दोन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्धे माल जप्त करण्यात आला. स्वप्नील विष्णू गवळी (तीस वर्षे, राहणार भोकरदन जिल्हा जालना ), आकाश रमेश गवळी ( तेवीस वर्षे, राहणार वालसावंगी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना ), पवन जगन सपकाळ ( पंचवीस वर्षे, राहणार सुंदरवाडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना ), दत्ता सुनील राऊत ( पंचवीस वर्षे, राहणार मुकुंद वाडी, टाऊळका जिल्हा छत्रपती संभाजी नगर ) आणि लखन शालिग्राम सूर्यवंशी ( वय चौवीस, राहणार जनुना तालुका व जिल्हा बुलढाणा ) अशी आरोपीची नावे आहे. त्यांच्या विरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम ३१०(४), (५) तसेच शस्त्र कायद्याच्या कलम ३/२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या अन्य साथीदाराच्या शोधासाठी दोन पथक जालना व संभाजीनगर जिल्ह्यात रवाना करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. आशिष रोही, दीपक लेकुरवाळे, राजू आडवे, विकास देशमुख, इजाज खान, रघुनाथ जाधव, गणेश पाटील, शेख चांद, संजय भुजबळ, युवराज राठोड, पुरुषोत्तम आघाव, वैभव मगर, भरत जाधव, गजानन गोरले यांनी ही कामगिरी बजावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मोडस ऑपरेंडी’

या टोळीची कार्य पद्धती (मोडस ऑपरेंडी) आगळीवेगळी आहे. गाव शहराच्या बाहेर असलेल्या दुकान, प्रतिष्ठान, विक्री केंद्र असलेल्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवायची. त्यांची दैनंदिनी प्रामुख्याने रात्री घरी परतण्याची वेळ लक्षात घेऊन निर्जन ठिकाणी अडवायचे. पिस्तूल आणि चाकू चा धाक दाखवून व्यापाऱ्यांजवळील रोख रक्कम, किमंती वस्तू, हिसकावून बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर पळून जायचे. प्रसंगी व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यास देखील ते मागे पुढे पाहत नाही.