लोकसत्ता टीम नागपूर: पुण्यातील भीमा-कोरेगाव विजयस्तंभ येथे २०१८ मध्ये दंगल झाली होती. याप्रकरणी आयोगासमोर चौकशी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवावे,अशी विनंती आयोगाकडे केली आहे. त्यावर मंगळवारी नागपूरमध्ये रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस सोबतच २०१८ साली राज्याचे मुख्य सचिव असलेले सुमित मल्लिक आणि पोलीस ग्रामीणचे तत्कालीन पोलीस आयुक्त सुवेझ हक यांनाही चौकशीसाठी आयोगाने पाचारण करावे, अशी विनंती आयोगाला लिहलेल्या पत्राद्वारे केली आहे. आणखी वाचा- वाशिम: रात्री १ वाजता येणारी मुंबई एक्सप्रेस पोहचली ३ वाजता; प्रवाशांना मन:स्ताप यासंदर्भात पत्रकारांशी विचारणा केली असता रामदास आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी सूचना केली असली तरी कोणाला चौकशीसाठी बोलावावे हा अधिकार आयोगाचा आहे. पण जर आयोगाने फडणवीस यांना बोलावले तर ते नक्कीच जातील. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. त्यांनी संपूर्ण राज्यात शांतता ठेवण्याचे काम केले.