अमरावती : मध्‍य रेल्‍वेच्‍या पाच विभागांमध्‍ये जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्‍यांच्‍या कालावधीत रेल्‍वेमार्गावर तब्‍बल २ हजार ३८८ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत हे प्रमाण १४ टक्‍क्‍यांनी कमी असले, तरी रेल्‍वे रुळ ओलांडताना होणारे अपघाती मृत्‍यू रोखण्‍याचे आव्‍हान रेल्‍वे प्रशासनासमोर आहे.

मध्‍य रेल्‍वेचे मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर आणि नागपूर असे पाच विभाग आहेत. या विभागांमध्‍ये जानेवारी ते ऑक्‍टोबर २०२३ मध्‍ये रेल्‍वेमार्गावर मृत्‍यूची २ हजार ७५५ प्रकरणे उघडकीस आली होती. या वर्षी दहा महिन्‍यांत ३६७ प्रकरणे कमी झाली आहेत. रेल्‍वेमार्गावर जखमी होण्‍याच्‍या प्रकरणांमध्‍ये देखील घट दिसून आली आहे. जानेवारी ते ऑक्‍टोबर २०२३ या कालावधीत रेल्‍वेमार्गावर १३५२ जण जखमी झाले होते. यंदा दहा महिन्‍यांमध्‍ये १२११ जण जायबंदी झाले आहेत.

हेही वाचा…पती, पत्नी और वो! पत्नीच्या मैत्रिणीवर पतीचे प्रेम…

रेल्‍वेमार्गावर मृत्‍यू किंवा जखमी होण्‍यामागे धोकादायकरीत्‍या रेल्‍वे रुळ ओेलांडणे, हे एक प्रमुख कारण समोर आले आहे. अनेक भागात रेल्‍वेमार्गाच्‍या नजीक लोकवस्‍ती असते. परिसरातील लोक वेगवेगळ्या कामासाठी रुळ ओलांडत सतात. रेल्‍वे रुळ ओलांडण्‍याच्‍या नादात ते रेल्‍वेखाली येऊन मृत्‍युमुखी पडतात. यावर उपाय म्‍हणून रेल्‍वे प्रशासनाने ‘ब्‍लॅक स्‍पॉट’ शोधले असून, त्‍या भागात संरक्षण भिंती, जाळी उभारून उपाययोजना केल्‍या आहेत.

धावत्‍या रेल्‍वेगाडीतून पडल्‍यामुळे गेल्‍या दहा महिन्‍यांमध्‍ये ६५३ जण मृत्‍युमुखी किंवा जखमी झाले आहेत. रेल्‍वे प्‍लॅटफॉर्म आणि रेल्‍वेगाडी यांच्‍यामध्‍ये कोसळून ९१ जण जखमी किंवा मृत्‍युमुखी पडले आहेत. आत्‍महत्‍या, विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू, हृदयविकाराचा धक्‍का, आजार यासारख्‍या कारणांमुळे मृत्‍यूची १४२३ प्रकरणे निदर्शनास आली आहेत. मध्य रेल्वेने ‘मिशन झिरो डेथ’ अंतर्गत अशा प्रकारच्या घटना कमी करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहिमा राबवून ठोस प्रयत्न केले आहेत ज्यात अल्पकालीन आणि दीर्घकालीन मोहिमांचा समावेश आहे.

हेही वाचा…आता दहावीनंतरच डॉक्टर होता येणार! जाणून घ्या सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्‍वे रुळ ओलांडणे रोखण्‍यासाठी रेल्‍वे पोलीस बलाचे कर्मचारी नियुक्त करणे, लोकवस्‍ती असलेल्‍या भागात संरक्षण भिंत बांधणे, रेल्वे हद्दीतील, रेल्‍वे रुळाजवळील अतिक्रमण हटवणे, जागरूकता कार्यक्रम, रेल्वे कायद्याच्या १४७ कलमानुसार दंडात्मक कारवाई, अशा उपाययोजना केल्‍या जात आहेत. दीर्घकालीन योजनांमध्‍ये प्‍लॅटफॉर्म रुंदीकरण, नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम, फूट ओव्‍हर ब्रीजचे बांधकाम, भुयारी मार्गांचे बांधकाम, एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्‍यासाठी रुळ ओलांडू नये म्हणून एस्केलेटर आणि लिफ्ट, असे उपाय केले जात आहेत.