नागपूर: शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा..,गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

नोंदणीसाठी कोणते कागदपत्र हवे

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.

आज अखेरचा दिवस

योजनेसाठी नोंदणी करण्याचा शुक्रवार १३ सप्टेंबर २०२४ हा शेवटचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांना http://www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत कळवण्यात आले आहे.

हे ही वाचा..,बुलढाणा : मानव-वन्यजीव संघर्ष; तब्बल पाच बिबट जेरबंद…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकप्रिय घोषणांची मालिका

महाराष्ट्र शासनाने यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये शासनाकडून दिले जाणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून नियुक्तीची योजना जाहीर करण्यात आहे. आता शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत ही योजना जाहीर करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यावर डोळा ठेवूनच लोकप्रिय घोषणाची मालिका शासनाने सुरू केली आहे. पुढच्या काळातही अशाच प्रकारच्या काही योजनांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.