नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने नागपुरातील बी. आर. मुंडले शाळेच्या सभागृहात माजी आमदार स्व. रामदास आंबटकर यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले करोना प्रतिबंधक लस घेतल्याने साईड इफेक्ट झाले. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले? हे आपण बघू या.
श्रद्धांजली कार्यक्रमाला प्रामुख्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील आंबेकर, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, सुधाकर कोहळे यांच्यासह स्व. रामदास आंबटकर यांच्या पत्नी, मुलगा व मुलगी मंचावर उपस्थित होते. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, करोनाच्या कठीन काठात करोना प्रतिबंधात्मक इंजेक्शन घेतले नसते तर आपण सगळे मृत्यू मुखी पडलो असतो. इंजेक्शन घेतल्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होत असल्याचे बोलले जाते. परंतु ही इंजेक्शन घेणे गरजेचे होते. दरम्यान संघ व भाजपचे कार्यकर्ते रामदास आंबटकर यांनीही तब्येतीकडे दुर्लक्ष केले. संघासह भाजपसाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रकृतिकडे लक्ष द्यायला हवे. संघ आणि भाजपने क्रिम लोक विकसीत केले. आताच्या देहबोलीतून हे संस्कार दिसूनही येत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी रामदास आंबटकर यांनी विद्यार्थी परिषदेसह भाजप वाढवण्यासाठी कठीन स्थितीत केलेल्या विविध कामांना उजाळा दिला. सोबत त्यांनी आंबटकर यांच्याकडे लोकांना जोडण्याची असलेल्या कलेचीही माहिती देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
वर्धेसारख्या खडतर जिल्ह्यात संघटना वाढवली- गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले, वर्धा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. येथे महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा भारी होता. येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव साठे खासदार म्हणून निवडून जायचे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना येथे पक्षाला काही संधी असल्याचे कधीही वाटले नाही. परंतु येथे रामदास आंबटकर यांच्या कुटुंबाने प्रथम विद्यार्थी परिषद आणि त्यानंतर भाजप पक्ष वाढीसाठी खूप परिश्रम घेतले. त्यामुळेच येथेही भाजपला चांगले दिवस आल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
चांगली माणसे घडवणे संघाची पद्धत- सुनील आंबेकर
चांगली माणसे घडवणे व त्यांना चांगले संस्कार देणे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पद्धत आहे. माजी आमदार स्व. रामदास आंबटकर हेही त्यातील एक होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब संघाच्या विचारांशी जुळलेला होता. त्यांचे काम समाजातील मागे राहिलेल्यांसाठी मोठे होते. त्यांच्या कामाची प्रेरणा प्रत्येक कार्यकर्त्याने घेण्याची गरज असल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले.