नागपूर : जंगलालगतच्या शेतातील खुल्या विहिरी वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या खुल्या विहिरींमध्ये वन्यप्राणी पडण्याचे प्रमाण वाढतच चालले असून या खुल्या विहिरींवर झाकण लावण्याची योजना फक्त कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गुरुवारी एक बिबट या खुल्या विहिरीत पडला आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या बचाव पथकाने त्याला जीवदान दिले.
हिंगणा वनक्षेत्रालगत असलेल्या बोर व्याघरप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील देवळी पेंढरी येथील शेताच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वाचवण्यात आले. बिबट्या विहिरीच्या आत खडकाळ काठावर लटकत होता. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, दोन दिवसांपूर्वी एक मादी अस्वल तिच्या दोन बछड्यांसह नदीकाठी फिरताना दिसली. या दरम्यान, अस्वलाच्या पिल्लांचा पाठलाग करत असताना, देवळी पेंढरी येथील रमेश उईके यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला असल्याचा संशय आहे.
गुरुवारी, सकाळी ११ वाजताच्या सुमारास काही शेतकऱ्यांना विहिरीच्या आतून आवाज येत असल्याचे ऐकू आले. आम्ही विहिरीत डोकावले तेव्हा एका बाजूला खडकाळ पृष्ठभागावर एक बिबट्या दिसला. घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच पंकज तेलंग इत्यादी तिथे पोहोचले. तेलंग यांनी ही बाब बोर बफरच्या कवडस वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपूरकर यांना कळवली. त्यांनी बचावासाठी प्रादेशिक वन विभागाचे उप वनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राचे समन्वयक कुंदन हाते यांची मदत घेतली.
त्यानंतर ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या डॉ. प्रियल चौरागडे, सिद्धांत मोरे, वनपाल रावळे, वनरक्षक प्रतीक घाटे, स्वप्नील भुरे, चेतन बारस्कर, बंडू मगर यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. दोरीच्या मदतीने, पथकाने विहिरीत एक बचाव पिंजरा खाली केला. जेव्हा हा पिंजरा बिबट्याजवळ आणला गेला तेव्हा ती बिबट पिंजऱ्यात शिरला. त्यानंतर पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून आणि वर खेचून बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सध्या बिबट्यावर ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. तो बरा झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल. दरम्यान, उन्हाळ्यच्या दिवसात या घटना वारंवार घडतात. त्यामुळे विहिरींवर झाकण लावण्याची कागदावर असलेली योजना प्रत्यक्षात उतरवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.