गडचिरोली : मागास आणि दुर्गम अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात केवळ नोकरीच नव्हे तर शेकडो उद्योजक निर्माण करण्याची क्षमता ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या ‘सीआयआयआयटी’ सेंटरमध्ये असून यामुळे येत्या काळात गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आज बुधवारी शहरातील गोंडवाना विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन,इनोव्हेशन, इंक्यूबेशन अँड ट्रेनिंग’चे शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

टाटा तंत्रज्ञान, जिल्हा प्रशासन आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारातून १७० कोटींच्या ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कौशल्य विकास केंद्राचे बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्राची संपूर्ण माहिती जाणून घेतली. गडचिरोलीसारख्या ठिकाणी प्रगत तंत्रज्ञानानी सज्ज असे प्रशिक्षण केंद्र बघून मुख्यमंत्री देखील अवाक् झाले. यावेळी ते म्हणाले की, टाटा टेक्नॉलॉजी’चे हे कौशल्य विकास केंद्र गडचिरोलीच्या विकासात मोठी भूमिका बजावणार आहे. यातून वर्षाकाठी ४८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात रोजगारासोबत येथून उद्योजक देखील बाहेर पडतील. मी गडचिरोलीचा पालकमंत्री असताना टाटा कंपनीला विनंती केली होती. त्याचे परिणाम हळू हळू दिसायला लागले आहे. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोलीकडे विशेष लक्ष आहे. आम्ही सर्वांनी मिळून येथील पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले आहे. सूरजागडसारखा लोह प्रकल्प सुरू केला. यामुळे अनेकांना रोजगार प्राप्त होतो आहे. विमानतळाच्या सर्वेक्षणाचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात असे अनेक प्रकल्प सुरू होणार आहे. असे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्र कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि टाटाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>उपविभागीय अभियंत्याच्या ‘कार’मधून ५ लाख लंपास; खामगाव मधील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नक्षलवाद हद्दपार आणि दहा लोह प्रकल्प रांगेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीची ओळख आदिवासी, मागास अशी असून नक्षलवाद हद्दपार झाल्याचे म्हटले. सूरजागड सारखा प्रकल्प उभा झाला. आता त्यासारखे आणखी १०-१२ प्रकल्प गडचिरोलीत येण्यास उत्सुक असल्याचे यावेळी सांगितले. यातून सूरजागड, झेंडेपार भागातील प्रस्तावित लोहखाणी सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्याचे त्यांनी संकेत दिले आहे.