अमरावती : ढोमणबर्डा हे मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सुमारे चारशे लोकवस्तीचे गाव. गावात वीज पोहचली खरी, पण हीच वीज एका आदिवासी कुटुंबासाठी संघर्षाचे कारण ठरली आहे. माधुरी गोपाल मोरे ही अकरावीतील विद्यार्थिनी सध्या आपल्या घरचा वीज पुरवठा पुर्ववत व्हावा, यासाठी वणवण फिरत आहे. पण तिचे कुणीही ऐकून घेण्यास तयार नाही. गेल्या आठ वर्षांपासून तिच्या घरात वीज नाही. पण, तिला तब्बल १८ हजार ९६० रुपयांचे वीज बिल आले आहे. ही एका गरीब आदिवासी कुटुंबासाठी मोठी व्यथा ठरली आहे. त्यांची अंधारयात्रा कायम आहे. माधुरी हिने सांगितले, आमची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. घरी केवळ दीड एकर शेतीचा तुकडा आहे. घरी आम्ही तिघी बहिणी आहोत.
दोघी शिकत आहोत. माझी पुढे शिकण्याची इच्छा आहे. २०१७ मध्ये ९ हजार रुपये इतके वीज बिल आले. घरी, दोन दिवे, एक पंखा आणि टीव्ही एवढीच उपकरणे असताना इतके वीज बिल कसे हा प्रश्न आमच्या कुटुंबीयांना पडला. वीज बिल कमी करावे, म्हणून महावितरणच्या कर्मचारी, अधिकारी वर्गाकडे येरझारा घातल्या, पण कुणीही दिलासा मिळवून दिला नाही. वीज बिल भरण्याची स्थिती नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आले. यापुढे वीज बिल वाढेल, म्हणून आम्ही विजेचे मीटरही काढून नेण्यास सांगितले. त्यानंतर कुणी त्यांच्या घरी आले नाही.
पण, अलीकडे जेव्हा मोरे कुटुंबीयांना १८ हजार ९६० रुपयांचे वीज बिल त्यांना मिळाले, हा त्यांच्यासाठी विजेहूनही मोठा धक्का होता. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने एवढी रक्कम आम्ही भरू शकत नाही, तेव्हा वीज बिलातून सूट मिळावी आणि आमच्या शिक्षणासाठी किमान वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी माधुरीची माफक अपेक्षा आहे.
गेल्या आठ वर्षांपासून मोरे कुटुंबीय अंधारात जगत आहेत. आजूबाजूच्या लोकांना वीज द्या, म्हणून त्यांनी विनंती केली, पण त्यांचाही वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, म्हणून कुणी त्यांच्या मदतीला आले नाही. मोबाईल चार्ज करण्यासाठी माधुरीला दुसऱ्यांच्या घरी जावे लागते. माधुरीची मोठी बहीण महक बीएला शिकत आहे. तिची देखील पुढे शिकण्याची इच्छा आहे. पण, वीज पुरवठ्याचा मोठा अडथळा त्यांच्या मार्गात आहे. ऑनलाईनच्या युगातील ही शोकांतिका ठरली आहे.