लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यातील हवामानात येत्या दोन दिवसात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद विदर्भातील अकोला शहरात झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

अवकाळी पाऊस परतल्यावर विदर्भात दिवसाच्या तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. तर किमान तापमान देखील वाढत आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. विदर्भात तापमानाचा पारा वेगाने वाढत असतानाच राज्यातील बहुतांश भागात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. अकोला व वाशीम जिल्ह्यात गुरुवारी ४२.८अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा वाढत आहे. दिवसाच नाही तर रात्रीच्या तापमानातदेखील वाढ होत आहे.

आणखी वाचा-भावना गवळींचे राजकीय भवितव्य अधांतरीच! मुख्यमंत्र्यांची ‘कामाला लागा’ सूचना वल्गना ठरणार?

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नांदेड, अकोला, बुलढाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमध्ये देखील उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे. महाराष्ट्रातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे. यात सुमारे चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्याचवेळी अवकाळी पावसाने अजूनही पाठ सोडलेली नाही. विदर्भातील नागपूरसह वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात तसेच कोल्हापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशिव येथे येत्या ४८ तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.