Maratha Reservation Protest Mumbai : नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढण्याचे सर्व श्रेय मंत्रिमंडळ उपसमितीला आहेत. माझ्यावर टीका झाली तरी समाजासाठी यापुढेही काम करीतच राहणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली.
जरांगे यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य करून सरकारने मराठा आरक्षणावर यशस्वी तोडगा काढला. यानंतर फडणवीस यांनी यावर मंगळवारी सायंकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी होती. पण त्यात कायदेशीर अडचणी होत्या. ही बाब मंत्रिमंडळ उपसमितीने जरांगे यांच्या लक्षात आणून दिली व ते त्यांनी मान्यही केले.
हैदराबाद गॅझेटच्या आधारावर आता नोंदी पडताळणी करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येईल, ज्याच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असेल त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल. मराठवाड्यातील मराठा समाजाला याचा फायदा होईल. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, असा तोडगा आम्हाला काढायचा होता. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या उपसमितीने यासंदर्भात अभ्यास करून या प्रश्नावर मार्ग काढला, या सर्वाचे श्रेय समितीला आहे, असे फडणवीस म्हणाले. माझ्यावर टीका झाली तेव्हाही मी विचलित झालो नव्हतो, आताही होणार नाही. या समाजासाठी यापूर्वीही काम करीत होतो पुढेही करीत राहणार, असे फडणवीस म्हणाले.