नागपूर : नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत असताना अजूनही थंडीचा प्रभाव जाणवला नाही. मात्र, रात्रीचा म्हणजेच किमान तापमानाचा पारा आता घसरायला लागला आहे. त्यामुळे आठ नोव्हेंबरपासून कमाल व किमान तापमानात २ ते ३ अंशाची घसरण होईल व बहुप्रतिक्षित अशा गुलाबी थंडी सुरुवात होईल असा अंदाज, भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातही थंडीला सुरवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर भारतात शक्तीशाली पश्चिमी झंजावातातून हंगामाला साजेशी बर्फवृष्टी होत आहे. मंगळवारच्या हलक्या सरीनंतर दोन दिवसांपासून विदर्भाचे आकाश निरभ्र झाले आहे. दोन दिवसानंतर महाराष्ट्रातही आकाश निरभ्र होईल असा अंदाज आहे. समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीपर्यंत उत्तर भारतातून ताशी दहा किलोमीटर वेगाने उत्तरी वाऱ्यांना सध्या कोणताही अडथळा जाणवत नसला तरी विदर्भातील पारा आणखी घसरेल.
तर ११ नोव्हेंबर पासुन पहाटेच्या किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या विदर्भाचे दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंशाच्या सरासरीत आहे. नागपूरच्या कमाल तापमानात अंशतः वाढ झाली आहे, तर किमान तापमानात घट झाली आहे. मात्र अद्याप रात्रीचे तापमान सरासरीच्या वर आहे. येत्या दोन दिवसात ते आणखी खाली येईल, असा अंदाज आहे.
नोव्हेंबरच्या उत्तरार्धात म्हणजेच १७, १८ तारखेपासून मात्र थंडीत वाढ होईल. नोव्हेंबर महिन्यातील किमान तापमान १० ते ११ अंशापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान संपूर्ण विदर्भात आकाश निरभ्र असून येत्या काळात पावसाची कोणतीही शक्यता जाणवत नसल्याचे मत हवामान अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
अवकाळी पावसामुळे ‘ऑक्टोबर हीट’चे चटके यंदा जाणवलेच नाहीत. बंगालच्या उपसागरात आलेले मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. हा महिना सुखावह गेला असतानाच त्यात आणखी भर पडणार असून, नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात थंडी अनुभवता येईल.
गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या भारतीय हवामान खात्याच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या दोन आठवड्यांत म्हणजे ७ ते २० नोव्हेंबरदरम्यान किमान आणि कमाल तापमान सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कोरडे हवामान, स्वच्छ आकाश यामुळे राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. पहाटे गारठा वाढला असून, धुक्यासह अनेक ठिकाणी दव पडल्याचे पाहायला मिळत आहे.
