नागपूर : सहा दिवसांचे अधिवेशन घेऊन सरकार केवळ औपचारिकता पूर्ण करीत असल्याचा आरोप भाजपने महाविकास आघाडी सरकारवर केला असला तरी या अधिवेशनाच्या निमित्ताने विधान परिषदेत विरोधी पक्षनेता ठरवताना भाजपलाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या या पदासाठी पक्षाकडून विदर्भातील परिणय फुके, मुंबईतील प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांची नावे चर्चेत आहेत.

१६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विशेष अधिवेशनादरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली. मात्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता नागपूर अधिवेशनादरम्यान ठरणार आहे. मागील पाच वर्षे चंद्रकांतदादा पाटील वरिष्ठ सभागृहात भाजपचे गटनेते होते. ते आता विधानसभेत आहेत. त्यांच्या जागेवर या अधिवेशन काळात भाजपला गटनेता निवडावा लागणार आहे. या पदासाठी विदर्भातील डॉ. परिणय फुके, मुंबईतील प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांची नावे चर्चेत आहेत.

७८ सदस्यीय विधान परिषदेत २२ सदस्य भाजपचे आहेत. त्यांना रासप आणि दोन अपक्षांचे समर्थन आहे. गटनेता ठरवताना पक्षापुढे प्रादेशिक संतुलन राखण्याचे आव्हान आहे. विदर्भातून या पदासाठी परिणय फुके यांचे नाव चर्चेत आहे. यापूर्वी नितीन गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर या भाजपच्या वैदर्भीय नेत्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. मात्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद फडणवीस यांच्याकडे असल्याने परिषदेतील पदही विदर्भाकडे जाण्याची शक्यता नाही. मुंबईचा विचार झाल्यास भाई गिरकर हे पक्षाचे ज्येष्ठ  सदस्य या पदासाठी दावेदार ठरतात.

पक्षनिहाय संख्याबळ

भाजप-           २२

शिवसेना-       १२

राष्ट्रवादी-       १४

काँग्रेस-           १३

लोकभारती-    ०१

शेकाप-           ०१

पीरिपा-          ०१

रासप-            ०१

अपक्ष-            ०६

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्त-            ०७