नागपूर: काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने टिका करत आहे. त्यांनी अकरा वर्षांच्या काळात भाजप सरकारने काहीच केले नाही. फक्त स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी थेटच भाष्य केले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी रोज भाजपवर तुटून पडत आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत मतदान घोटाळा झाल्याचाही आरोप त्यांनी केला होता. भाजपने महाराष्ट्राची विधानसभा चोरली, अधिकाऱ्यांना हाताशी धरून विधानसभेच्या निवडणुकीत मॅचफिक्सिंग केली, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर अकरा वर्षांच्या कार्यकाळात भाजपने काहीच केले नाही. फक्त स्वप्ने दाखवून दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘राहुल गांधी यांना काँग्रेसचेच नेते गांभीर्याने घेत नाहीत, तुम्ही कशाला घेता,’ असा टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने अकरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या अकरा वर्षात भाजपने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती गडकरी यांनी दिली. यावेळ त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस नेते यावर करीत असलेली टीकाटीपणी आणि आरोपांचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘काँग्रेसच्या साठ वर्षांच्या कार्यकाळात जे झाले नाही ते आम्ही अवघ्या अकरा वर्षांत करून दाखवले. ही कामगिरीची देशाच्या इतिहासात नोंद करण्यासारखी आहे.’
आम्ही लोकांना स्वप्ने दाखवतो, दिशाभूल हे राहूल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. आम्ही काही स्वप्ने दाखवत नाही तर जे काही केले त्याची माहिती दिली. याचे सर्व दाखले आणि आकडेवारी सर्वत्र उपलब्ध आहेत. आतापर्यंत अकरा वर्षांत देशाचा जो विकास केला, भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानावर आणली याचा सर्व लेखाजोखा उपलब्ध आहे. विरोधकांनी आधी तो तपासून घ्यावा. राहिला २०४७ च्या विकसित भारताचे स्वप्न तेही पूर्ण केले जाणार आहे. आमच्या कामामुळे, धोरणामुळे यापुढे देशातील जनता पुन्हा भाजपवरच विश्वास ठेवतील असा दावाही नितीन गडकरी यांनी केला.
देशाचा माल वाहतूकीचा खर्च ६ टक्यांनी घटला
अकरा वर्षांत देशभरात रस्त्यांचे जाळे विणण्यात आले. उड्डाण पूल निर्माण करण्यात आले. त्यामुळे भारताचा माल वाहून नेण्याचा खर्च सुमारे सहा टक्क्यांनी कमी झाला आहे. हे आम्ही म्हणत नाही. बंगलोरआयआयएम, चेन्नई आयआयटी, कानपूर आयआयटी या सारख्या नामांकित संस्थांनी अभ्यास करून हे सांगितले आहे. अकरा वर्षांपूर्वी आपला माल वाहतूकीचा खर्च खर्च १६ टक्के होता तर चीन आठ, अमेरिकेचा १२ टक्के होता. आज आपला खर्च दहा टक्क्यांवर आला आहे. पायाभूत सुविधांवर एक टक्के खर्च केला तर औद्योगिक उत्पादन खर्चाच्या बचतीत सुमारे साडेतीन टक्क्यांनी कपात होते. या डिसेंबर महिन्यापर्यंच हा माल वाहतूकीचा खर्च नऊ टक्क्यांवर आणण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले.