चंद्रपूर : काँग्रेसकडून जुनोना-चिचपल्ली क्षेत्रातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या आणि जिल्ह्यात वाळू तस्करीचे ‘सिंडीकेट’ चालवणाऱ्या मधू मेश्राम यांनी २८ सप्टेंबरला मूल येथे फडणवीस वाड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. ही भेट राजकीय, की काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात वाळू तस्कारीचे मोठे ‘रॅकेट’ सक्रिय आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे २० सप्टेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी ब्रह्मपुरी या एकट्या तालुक्यातून वाळू तस्करीच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले होते. राजकीय आशीर्वादानेच ही वाळू तस्करी सुरू आहे. मात्र, आता अवैध व्यवसायातून गलेलठ्ठ पैसा कमावणारे राजकीय आखाडयात उतरण्याच्या तयारीत आहेत.
जिल्ह्यात वाळू तस्करीचे ‘सिंडीकेट’ चालवणाऱ्या मेश्राम यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जुनोना-चिचपल्ली क्षेत्रातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. याचदरम्यान मेश्राम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. छायाचित्रात मुख्यमंत्री फडणवीस, त्यांच्या काकू माजी मंत्री शोभा फडणवीस व मेश्राम, हे तिघेही स्पष्टपणे दिसत आहे. मेश्राम यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंध जोपासले आहेत.
मेश्राम यांचा जिल्हा व पोलीस प्रशासनात दबदबा आहे. त्यांच्या संमतीशिवाय या भागात वाळू भरलेले वाहन रस्त्यावरून धावत नाही. त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतरच वाहन पास होते. असा व्यक्ती मुख्यमंत्र्यांसोबत दिसल्याने जिल्ह्यातील राजकारण नेमके कोणत्या दिशेने चालले आहे, असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
उमेदवारी देऊ नये – वैद्य
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी मेश्राम यांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितल्याचे सांगितले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी काँग्रेस असो की महाविकास आघाडीतील घटक पक्ष, सर्वांनीच प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, माफिया किंवा अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांना उमेदवारी देवू नये, राजकारणापासून दूर ठेवावे, अशी मागणी केली आहे.
मूल येथील फडणवीस वाड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मी व्यवसायीक आहे, माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. ही भेट व्यवसायिक होती.मधू मेश्राम.