नागपूर : महाराष्ट्रात पूरस्थिती जवळपास सहा जिल्ह्यात आहे. महायुती सरकारने सर्व भागांमध्ये स्थानिक अधिकारी वर्गांना नुकसान भरपाई संदर्भात पाहणी करून नागरिकांना आवश्यक ती मदत करण्याचे आदेश दिले आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भाजपच्या सर्व आमदार खासदारांनी एका महिन्याचे पूर्ण वेतन आपत्तीग्रस्तांना देण्याच ठरवले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सहा महिन्याचे वेतन दिले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. राजकारण म्हणून या सगळ्या गोष्टी करणे योग्य नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना सहा महिन्याचे वेतन मदत म्हणून देण्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
सर्व सोंग आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करताना केले होते. त्याबाबत वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी सहा महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीत देण्याची घोषणा आज सकाळी केली होती. त्याबाबत रवींद्र चव्हाण यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ग्रामीण भागात असणारा लोकप्रतिनिधी यांना मिळणारे वेतन त्यांना प्रवास भत्यासाठी मिळत असते. त्यांची भावना काहीही असली तरीही यामध्ये राजकारण करणे योग्य नाही. काही लोकप्रतिनिधी प्रचंड गडगंज असतात तर ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना प्रवास भत्ता आणि इतर व्यवस्था करायची असते. त्यामुळे आवश्यक ती मदत सरकार म्हणून करेल यामध्ये शंका नाही. मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आवश्यक त्या ठिकाणी जाऊन मदत करत आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये, मात्र मदत करण्याची भावना सर्वांची असली पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.
वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
दरम्यान, मराठवाड्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता दौरे करत आहे पण हा केवळ देखावा आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी विचारलं किती मदत देणार सांगावे तर ते म्हणतात राजकारण करू नका! शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला यात राजकारण कुठे आहे? सरकार जर बांधावर गेले आहे तर का जनतेला ठोस आश्वासन देत नाही, मदत किती देणार हे का लपवत आहे? याचा अर्थ मदत करण्याची नियत सरकारची नाही, ही बनवा बनवी सरकार करत आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.