लोकसत्‍ता टीम

अमरावती : जिल्‍ह्यात महायुतीने घवघवीत यश संपादन केले असताना महाविकास आघाडीला मात्र चांगली कामगिरी करता आलेली नाही. जिल्‍ह्यात काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्‍यातच आता महाविकास आघाडीतील घटक असलेल्‍या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे बडनेरा मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुनील खराटे यांनी काँग्रेसच्‍या नेत्‍यांवर धक्‍कादायक आरोप केले आहेत. सुनील खराटे हे शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुखही आहेत. या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्‍या प्रीती बंड यांनी बंडखोरी केली होती.

जिल्ह्यातील काही काँग्रेस नेत्यांनी आघाडीच्या उमेदवाराचे काम न करता चक्क बंडखोर अपक्ष उमेदवारास आर्थिक रसद पुरवित आघाडीचा धर्म पाळला नसल्याचा गंभीर आरोप सुनील खराटे यांनी केला आहे. या कामी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे देखील सुनील खराटे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा-केवळ दहाच आमदार आल्यामुळे त्यांचे राजकारणातून संपले… आत्राम यांची शरद पवार यांच्यावर टीका

सुनील खराटे हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. तरीही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आपल्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती. प्रचारसभा, पदयात्रा, बैठक यासाठी यशोमती ठाकूर आणि काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांना वेळोवेळी निमंत्रण देण्यात आली. परंतु कुठल्याही प्रचारास उपस्थित न राहता त्यांनी निवडणूक रिंगणात असलेल्या एका बंडखोर अपक्ष उमेदवार आर्थिक रसद पुरवित अप्रत्यक्षपणे त्यांचा प्रचार केला आणि तो उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले असा गंभीर आरोप सुनील खराटे यांनी केला आहे. प्रचारासाठी येणे होत नसेल तर किमान समाज माध्‍यमांवर आवाहन करणारी एक दोन मिनिटांची चित्रफित तयार करून द्यावी अशी विनंती यशोमती ठाकूर यांना केली असता त्यासाठी देखील त्यांना सवड नव्‍हती, या सर्व प्रकारासंदर्भात आपण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलणार असल्याचे खराटे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : ८ लाडक्या बहिणींना मतदारांनी नाकारले, डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यामध्ये शिवसेनेची देखील महत्त्वाची भूमिका होती. बळवंत वानखडे यांनी आपल्‍या प्रचारादरम्‍यान दोन-तीन वेळा प्रचार सभा व पदयात्रेसाठी स्वतःहून वेळ दिली. पण त्यांना सवड मिळाली नाही. समाज माध्‍यमावर संदेश देण्याची विनंती केली असता ते सुद्धा जाणीव पूर्वक टाळले. विशेष म्हणजे शिवसेना व काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना अपक्ष बंडखोर उमेदवाराचे काम करा अशी विनंती देखील खासदारांनी केल्याची माहिती आपणास असल्याचे सांगून आपले लोकप्रिय खासदार खूप व्‍यस्‍त झाले, असा टोला सुनील खराटे यांनी लगावला आहे.