लोकसत्ता टीम

नागपूर : उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान ग्राम सडक योजनेच्या कामानिमित्त फडणवीस यांची भेट घेतल्याचे पारवे यांनी सांगितले

नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार पारवे भाजप मध्ये जाणार आणि त्यांना भाजपकडून रामटेक लोकसभेची उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेली पारवे – फडणवीस भेट महत्वाची मानली जात आहे.

आणखी वाचा-“भारतातील १४० कोटी नागरिक हिंदूच, अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण…”, संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामटेक हा मतदार संघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. सध्या येथे शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार आहेत. महायुतीच्या जागा वाटपात भाजपला ही जागा हवी आहे. पण अद्याप निर्णय झालेला नाही. हा निर्णय झाल्यानंतर राजू पारवे भाजप प्रवेशाचा निर्णय घेतील. तो पर्यत भेटीगाठी होत राहतील, असे सांगितले जाते. दरम्यान, या भेटीचा भाजप प्रवेशाशी संबंध नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील मतदार संघातील कामाबाबत फडणवीस यांची भेट घेतली, असे राजू पारवे यांनी लोकसत्ताला सांगितले.