चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. बँकेच्या निवडणूक रिंगणात लोकप्रतिनिधींनी उडी घेतल्याने चुरस चांगलीच वाढली आहे. आतापर्यंत ६१ उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले असून चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक १३ वर्षानंतर होऊ घातली आहे. २१ संचालकपदांसाठी होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. प्रमुख लढत मात्र काँग्रेस व भाजपमध्येच दिसत आहे. हे दोन विरोधी पक्ष या निवडणुकीसाठी काही ठिकाणी मित्र झाल्याचे चित्र आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष रावत यांच्या काळातील ‘अर्थपूर्ण’ नोकरभरतीने अनेकांचे डोळे विस्फारले. यामुळे जिल्हा बँक राजकीय नेत्यांच्या केंद्रस्थानी आली. सर्वपक्षीय नेत्यांनी बँकेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रस घ्यायला सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात वेगवेगळ्या गटाकडून ६१ नामनिर्देश दाखल करण्यात आले.

खासदार धानोरकर यांनी दोन गटांतून दावेदारी केली आहे. महिला राखीव आणि गट ब २ मध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परिस्थिती पाहून त्या एका गटातून माघार घेतील. महिला राखीव गटात खासदार धानोरकर यांच्यासह चंद्रपूर जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक नंदा अल्लूरवार, माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या स्नुषा स्मिता भांडेकर, रागिनी गुरूपुडे यांनी, तर गट ब मध्ये रोहित बोम्मावार, विद्यमान संचालक प्रकाश बनसोड, किशोर धुमाने, सुरेंद्र अडबाले, ॲड. वासुदेव खेळकर, प्रमोद मोटघरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आमदार वडेट्टीवार सिंदेवाही तालुक्यातून अ गटातील उमेदवार आहेत. आमदार जोरगेवार अनुसूचित जाती आणि जमाती गटातून रिंगणात उतरणार आहेत. निवडणुकीसाठी १० जुलैला मतदान आणि ११ जुलैला मतमोजणी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यकर्ते हिरमुसले पक्षविरहित युती-आघाडीसाठी पडद्यामागून मोठ्या हालचाली सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीच बँकेच्या राजकारणात प्रत्यक्ष उतरण्याची तयारी चालवल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते चांगलेच हिरमुसले आहेत. अ गटातील १४ तालुक्यांत ३९० मतदार आहेत. ब गट १ मध्ये २०३ आणि ब-२ मध्ये ३०८ मतदार आहेत.