अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अद्याप काँग्रेसला प्रस्तावच आला नाही. त्यांच्या प्रवक्त्याने पत्र लिहिले आहे. आघाडी करायची असल्यास पक्षाच्या अध्यक्षांनी स्वतः प्रस्ताव देणे अपेक्षित आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे किंवा सोनिया गांधी यांना प्रस्ताव द्यायला हवा. ॲड. आंबेडकरांना काँग्रेसचा विरोध असल्याचा प्रश्नच नाही. ते दोन वेळा काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत, असे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी आज येथे सांगितले.

हेही वाचा >>> “जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. २०२४ मध्ये हाेऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळणार नाही. हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. कारण सध्याचे वातावरणच त्यांच्या विरोधात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधूनही त्यांना विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किमान ७० जागा कमी होतील, असा दावा केतकर यांनी केला.

नरेंद्र मोदी यांच्या सत्तेची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली. विरोधकांचा आवाज दाबवण्यासाठी सर्वच यंत्रणांचा गैरवापर केला जातो. सध्याचा विचार केल्यास दक्षिणेसह देशातील विविध भागातील राज्यांमध्ये भाजपला स्थान नाही. राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला कमाल यश मिळाले. आता त्या राज्यांमध्ये देखील भाजपला उतरती कळा लागेल. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किमान ७० जागा कमी होतील. नरेंद्र मोदी सरकार बहुमतापासून दूर राहील, त्यावेळी मोदी नेमकी कुठली भूमिका घेतात, हे सांगणे अवघड आहे. ते अटलबिहारी वाजपेयींसारखा राजीनामा देणार नाहीत, असे खा. केतकर म्हणाले.

हेही वाचा >>> कराड : अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत विरोधकांकडून त्यांच्या सोयीचे अर्थ; मंत्री गिरीश महाजन यांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपविरोधी वातावरणाचा काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना फायदा होणार आहे. काँग्रेसच्या जागा १२० ते १३० पर्यंत जाण्याची शक्यता राहील. राज्यातील देखील काँग्रेसचे खासदार वाढतील. विविध राज्यातील प्रादेशिक पक्षांना चांगले यश मिळेल, असा अंदाज खा. कुमार केतकर यांनी व्यक्त केला. सध्या ‘इंडिया’ आघाडी मजबूतपणे विरोधात उभी आहे. पंतप्रधान पदासाठी सध्या कुठलाही चेहरा समोर केलेला नाही. ती काँग्रेसची परंपराच नाही. निवडणुकीनंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यात येईल, असे देखील ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजहर हुसेन, प्रदेश सचिव प्रशांत गावंडे, प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, प्रदीपकुमार वखारिया, महेंद्र गवई आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.