नागपूर : मोदी पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलले जाईल, असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे तर विरोधक अफवा पसरवित असल्याचा दावा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेकच्या प्रचार सभेत विरोधकांचा समाचार घेतला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे रविवारी आंबेडकर जयंती दिनी नागपुरात होते. त्यांनी येथील पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी कुठलेही राजकीय भाष्य केले नाही. पण संविधानाचे महत्व सांगताना ते वाचवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील हे स्पष्ट केले.

काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी खरगे नागपूरला आले. त्यांची नागपुरातील गोळीबार चौकात जाहीर सभा आहे. तत्पूर्वी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खरगे म्हणाले “ दिल्लीत संसदेत सकाळीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावून थेट नागपूरला आलोय. ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि बाबासाहेबांनी देशाला संविधान दिला आहे त्याच वाटेवर सर्व लोक चालावे हीच आमची अपेक्षा आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवण्यासाठी आम्हीं लढत आहोत आणि लढत राहू.”

हेही वाचा…चंद्रपूर : महाप्रसादातून १२५ जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू, सहा जण गंभीर

पत्रकारांनी खरगे यांना भाजपच्या जाहिरनाम्यावर प्रतिक्रिया मागितली असता ते म्हणाले दीक्षाभूमीला मी पवित्र स्थळ मानतो, त्यामुळे या विषयावर मी भाष्य करणार नाही. प्रचार सभेत जाहीरनामा आणि आमचा जाहीरनामा यासंदर्भात सविस्तर बोलेन, असे खरगे म्हणाले.