नागपूर : धाराशिवमध्ये लोकांचे संसार वाहून गेले, घर उजाडलं, पिकं बुडाली आयुष्याची कमाई पावसात वाहून गेली. इतकी वाईट वेळ आली असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नाचत आहेत. शेतकरी रडत असताना जिल्हाधिकारी नाचत आहेत, यावरून यांना परिस्थितीचे किती गांभीर्य आहे हे स्पष्ट दिसत आहे, अशी टीका काँग्रेसचे ते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सरकार असंवेदनशील असल्याने प्रशासनही बेदरकारपणे वागत आहे. प्रशासनाचे ‘आग लगे बस्ती मैं, हम हमारे मस्ती मैं…’ असे सुरू आहे.
इतके संवेदनशील आणि कार्यक्षम प्रशासन असताना सामान्य जनता, शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा ठेवू नये. या नाच गाण्यातून वेळ मिळेल तेव्हा पंचनामे होतील, तेव्हा मदत मिळेल. जसे सरकार तसे प्रशासन आहे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजे, लोकांना धीर दिला पाहिजे असं असताना जिल्ह्याचा प्रमुख नाचत आहे, यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक भागांतील पिके पाण्यात गेली आहेत. शेतकरी दु:खाने विव्हळत असताना जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांचा नाच करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासन प्रमुखांकडून संवेदनशीलतेची अपेक्षा असते. अशा आपत्तीच्या काळात ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देतील, मदतीचे आश्वासन देतील, अशी जनतेची अपेक्षा असते. मात्र, जिल्हाधिकारी सार्वजनिक कार्यक्रमात नाचताना दिसल्याने त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
राजकीय व सामाजिक संघटनांनीही यावर आक्षेप घेत, ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. “शेतकरी रडत आहेत आणि जिल्हाधिकारी नाचत आहेत” ही संतापजनक स्थिती असून, अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
या परिस्थितीत पंचनामे, मदत योजनांची अंमलबजावणी यास विलंब होत असल्याचेही बोलले जात आहे. “जसे सरकार तसे प्रशासन” ही टीका सोशल मीडियावर जोर धरत आहे. आता सरकारने याची तातडीने दखल घेऊन जिल्हा प्रशासनास स्पष्ट निर्देश द्यावेत आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्काळ कृती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.