चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीच्या पराभूत झालेल्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन काढले नाही, असा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यानुसार भाजपचे नेते व बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार, भाजपचे आमदार देवराव भोंगळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार मनोज कायंदे  यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या विजयाला २६ पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. यातील तीन प्रकरणावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने भाजपचे आमदार, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे (अप) आमदार मनोज कायंदे आणि भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांना समन्स बजावले. यावर तीन आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने या आमदारांना दिले.

बल्लारपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या, सिंदखेड राजाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मनोज कायंदे यांच्या आणि राजुराचे काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी देवराव भोंगळे यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. या तिघांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.

डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती वृषाली जोशी तर इतर दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली. तिन्ही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने विजयी उमेदवारांना समन्स बजावले असून तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या याचिकांमध्ये आरोप करण्यात आला आहे की, ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी निवडणूक आयोगाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही. निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केली नाही, आणि पराभूत उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म क्रमांक १७ दिले जात नाही. याशिवाय, व्हीव्हीपॅटची मोजणीही केली जात नाही. न्यायालयाने निवडणूक आयोग आणि इतर प्रतिवादींची नावे काढून टाकण्याचे आदेश देत केवळ विजयी उमेदवारांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्या बाजूने अॅड. आकाश मून, अँड.पवन डहाट यांनी बाजू मांडली.