लोकसत्ता टीम

नागपूर : क्रिकेट सट्टेबाजांचे नंदनवन असलेल्या नागपूर शहराला अनेक क्रिकेट बुकींची पसंती आहे. आज, शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या कोट्यवधीच्या सट्टेबाजीसाठी नागपुरात मुंबई, दिल्लीतील सट्टेबाजांनी मुक्काम ठोकला आहे. त्यांच्या दिमतीला नागपुरातील कुख्यात सट्टेबाज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात अनेक क्रिकेट सट्टेबाजांनी अन्य शहरात पळ काढला होता. मात्र, तेच क्रिकेट सट्टेबाज आता नागपुरात परतले आहेत. एका महिन्यात कोट्यवधी रुपयांच्या लागवाडी-खायवाडीची जबाबदारी नागपुरातील सट्टेबाज बोमा याच्याकडे देण्यात आली आहे. तो गेल्या १० वर्षांपासून सट्टेबाजींचा व्यवसाय करीत असून गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध आहेत. नागपुरात जवळपास ४० ते ४५ मुख्य सट्टेबाज असून ते सर्व मुंबई-दिल्लीच्या मोठ्या सट्टेबाजांसाठी काम करतात.

आणखी वाचा- ‘एसटी बँक’ अडचणीत! सभासदांच्या कर्ज पुरवठ्याला स्थगिती, कारण काय? वाचा…

शुक्रवारी चेन्नई विरुद्ध बंगळुरू या संघादरम्यान पहिला सामना खेळला जाईल. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे क्रिकेट सट्टेबाजांचा खायवाडी – लागवाडीवर मोठा कस लागणार आहे. नागपुरात जरीपटका, अजनी, नंदनवन, धरमपेठ, तहसील, कामठी, हिंगणा आणि वाडी परीसरात सट्टेबाजांच्या बैठकी आहेत. यावेळी अनेक नवनवीन सट्टेबाजांनी नशिब आजमावने सुरु केले आहे. अनेक क्रिकेट सट्टेबाजांच्या संपर्कात काही जुने कर्मचारी आहेत. त्यामुळे छापा घालण्यापूर्वीच माहिती लिक होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा- ‘अकोला पश्चिम’ची पोटनिवडणूक : काँग्रेसने विश्वास दाखवलेल्या साजिद खान पठाण यांची पार्श्वभूमी काय?

सट्टेबाजांच्या जाळ्यात अनेक तरुण सापडले आहेत. प्रलोभनाला बळी पडून अनेक तरुण आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळतात. काही तरुण कर्ज काढून तसेच व्याजाने पैसे घेऊन सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या वर्षी दोन युवकांनी सट्टेबाजीत मोठी रक्कम हारल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या.

एखाद्या मॅचवर सट्टा खुला करण्याआधी सट्टेबाज आणि त्यांचे साथीदार टोपण नावे जाहीर करतात. प्रत्येक सामन्याच्या नाणेफेकीवर सट्टा लागतो. नाणेफेकीनंतर सामन्याच्या विजय-पराभवाचा दर मोठ्या बुकींकडून छोट्या बुकींकडे येतो. छोट्या बुकींकडून रोजचे ग्राहक असणाऱ्यांकडे दर पोहोचतात. षटकात होणाऱ्या धावा, फलंदाजांकडून केल्या जाणाऱ्या धावा, तसेच प्रत्येक षटकावर सट्टा लावला जातो. हे सर्व मोबाइलवरून होते. सट्टा लावणाऱ्यांचे संभाषण बुकींकडून रेकॉर्ड केले जाते.