लोकसत्ता वार्ताहर

गडचिरोली : विधानसभा निवडणुकानंतरही जिल्ह्यात वाळूचा गोंधळ संपला नसल्याने सर्वत्र वाळू तस्करीला उत आला आहे. यामुळे मध्यरात्री अवैधपणे वाळू घेऊन भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या वाळू माफियांना महसूलमधील काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा असून यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.

नद्यांचा जिल्हा अशी ओळख असतानाही लिलाव प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे सर्वसामान्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. दुसरीकडे वाळू माफियानी महसूलमधील काही अधिकाऱ्यांना हाताशी घेत सर्रास तस्करी सुरु केल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोली शहाराजवळील गुरवळा घाटावर वाळू तस्करी करणाऱ्या वाहनाचा धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी गोगाव फाट्यावर मध्यरात्री एका वाळू तस्कराचा वाहनाने दुचाकीला उडविल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील कन्हेरी, गुरवळा, कठानी, आंबेशिवनी, चामोर्शी माल, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, अहेरी वांगेपल्ली, भामरागड आदी भागातील नदी घाटावरून सर्रास वाळू तस्करी सुरु आहे.

आणखी वाचा-कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सोडून, नागपुरातील ठाणेदार विकतायेत तिकीट…. प्रत्येकाला तीनशे…

जेसीबी, पोकलँडच्या माध्यमातून घाटातून उपसा करण्यात येत आहे. महसूलचे अधिकारी मात्र यावर कारवाई करण्याचे सोडून घरकुलासाठी वाळू नेणाऱ्या नागरिकांना त्रास देत असल्याचे चित्र. वाळू तस्करीतून मिळणाऱ्या नफ्यामुळे अनेक तरुण वाळू तस्करीकडे वळले असून काहींनी यासाठी टिप्पर आणि ट्रॅक्टर देखील खरेदी केले आहे. यतीलच एका तरुणाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, वाळू तस्करी करण्यासाठी एका ट्रॅक्टरमागे ४० तर टिप्परमागे ६० हजार रुपये महसूलच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात. रात्रीच्या सुमारास या घाटांवर वसुलीसाठी महसूलच्या अधिकाऱ्यांनी काही कर्मचारीही ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाच्याच संरक्षणात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरु असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

आणखी वाचा-प्रशासक नियुक्तीच्या भीतीपोटी युद्धपातळीवर मुलाखती, चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण

खनिकर्म विभागात ‘वाळू माफियां’चा वावर

विविध कारणांनी कायम वादग्रस्त ठरलेला खनिकर्म विभाग वाळू तस्करीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. या विभागाकडे केव्हाही फेरफटका मारल्यास तस्करांची टोळी बसलेली असते. खनिकर्म अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते उत्तर देत नाहीत. उलट रात्रीच्या सुमारास रेती घाट परिसरात ‘पिंटू’ नावाची व्यक्ती खनिकर्म अधिकाऱ्याच्या नावावर वसुलीसाठी फिरते, अशी माहिती आहे. याही संदर्भात विचारणा केळी असता खनिकर्म अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेमके कुणाचे राज्य सुरु आहे. अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी नुकताच जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतला आहे. त्यामुळे या संदर्भात माहिती घेत आहे. महसूल विभागात जर असा प्रकार सुरु असेल तर खापवून घेतल्या जाणार नाही. लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल. -अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी, गडचिरोली