भारतात गेल्या चार दशकांत प्रथमच कार्बन डायऑक्साईडची पातळी घसरली आहे. गेल्या दोन दशकांत प्रथमच कोळशाचा वापरही कमी झाला आहे. आर्थिक मंदी, अक्षय ऊर्जेतील वाढ आणि करोनाच्या परिणामामुळे ही स्थिती उद्भवली आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअरने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
कोळशाचा आणि तेलाचा वापर कमी झाल्यामुळे मार्च २०२०ला संपलेल्या आर्थिक वर्षांत उत्सर्जनात सुमारे एक टक्क्याने घट झाली. या आर्थिक वर्षांच्या अखेरीस कोल इंडिया लिमिटेडचे मुख्य उत्पादक असणाऱ्या कोळसा विक्रीत ४.३ टक्क्यांनी घट झाली. कोळशाच्या आयातीत ३.२ टक्क्यांनी वाढ झाली आणि कोळसा वितरणात मात्र एकूण दोन टक्क्यांनी घट झाली आहे. वर्षांच्या सुरुवातीला करोना विषाणूच्या उद्रेकामुळे आणि मागणी कमी झाल्यामुळे आर्थिक वर्षांत वापर केवळ ०.२ टक्क्यांनी वाढला. गेल्या २२ वर्षांतील ही सर्वात कमी वाढ आहे. मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत कच्च्या तेलाचे उत्पादन ५.९ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्याचवेळी नैसर्गिक वायू उत्पादनात ५.२ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१८-१९ च्या तुलनेत प्रक्रिया केलेल्या कच्च्या तेलाच्या बाबतीत मागील आर्थिक वर्षांत १.१ टक्क्यांनी घट झाली आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन सुमारे ३० दशलक्ष टनाने कमी झाल्याचा अंदाज आहे. चार दशकातील ही पहिलीच वार्षिक घसरण आहे. सध्याच्या परिस्थितीत कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनावर मोठा परिणाम होत असताना भारतात ऊर्जेचा वापर आणि उत्सर्जनाच्या दीर्घकालीन प्रक्षेपणावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे या अभ्यासात म्हटले आहे.
२०२२ पर्यंत १७५ गिगावॉट अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे. त्यामुळे कोळशावर आधारित प्रदूषण करणारे वीज प्रकल्प सुरू ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती आणि त्याच्या वापराकडे आपण वळायला हवे.
– सुनील दहीया, विश्लेषक, सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअर.