लोकसत्ता टीम

नागपूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराने जोर पकडला आहे. उमेदवारांना खर्च मर्यादा निश्चित करून देण्यात आली असून त्यावर निवडणूक आयोगाचे लक्ष आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या निवडणूक खर्चाचा तपशील सादर करावा लागतो. पहिल्या आठवड्याच्या तपशिलानुसार काही उमेदवारांनी खर्चात हात मोकळा सोडल्याचे व काहींनी काटकसर केल्याचे दिसून येते.

नागपूर शहरातील सहा मतदारसंघात खर्चात सर्वात आघाडीवर दक्षिण नागपूरचे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव आहेत. त्यांच्या पाठोपाठ उत्तर नागपूरमधील भाजप उमेदवार डॉ. मिलिंद माने व मध्य नागपुरातील प्रवीण दटके यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी खर्च मध्य नागपुरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेकळे यांचा असून त्यानंतर पश्चिम नागपूरमधील भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचा क्रमांक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खर्च ५० हजारांपेक्षा किंचित अधिक आहे.

आणखी वाचा-काँग्रेस उमेदवाराच्या मांसाहार पार्टीत एकाचा मृत्यू

आयोगाला सादर केलेल्या पहिल्या टप्प्यातील खर्चाच्या तपशिलानुसार दक्षिण नागपूरमधील काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव (६ लाख ५६ हजार), त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे मोहन मते (१ लाख ५४ हजार) यांनी खर्च केला आहे. मतेंच्या खर्चावर प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. उत्तर नागपूरचे भाजप उमेदवार डॉ. मिलिंद माने (४ लाख १७ हजार) त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नितीन राऊत (२ लाख २८ हजार) यांचा खर्च मानेंच्या निम्मे आहे, पूर्व नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार) दुनेश्वर पेठे यांनी खर्चात आघाडी घेतली आहे. कृष्णा खोपडे (१ लाख ६० हजार), दक्षिण-पश्चिममध्ये भाजप उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी ६४ हजार रुपये खर्च केले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी २ लाख ९१ हजारांचा खर्च दाखला. पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी १ लाख तर भाजपचे सुधाकर कोहळे यांनी ५४ हजारांचा खर्च दाखवला आहे.

मध्य नागपुरात भाजप उमेदवार प्रवीण दटके यांनी विरोधकांच्या तुलनेत खर्चात बरेच आघाडीवर आहे. त्यांनी ३ लाख ५६ हजारांचा खर्च केला. तर कॉंग्रेस उमेदवार बंटी शेकळेंचा खर्च ४४ हजारांच्या घरात आहे.

आणखी वाचा-‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज दुसऱ्या टप्प्यातील तपासणी

दक्षिण-पश्चिम, दक्षिण, नागपूर पूर्व, मध्य, पश्चिम व उत्तर (अ.जा) या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे दुसऱ्या टप्प्यातील खर्च लेखे तपासणी सोमवारी (११ नोव्हेंबर) सकाळी १० ते ५ या वेळात बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे तर ग्रामीणमधील सर्व मतदारसंघाची खर्च लेखे तपासणी सरपंच भवनात केली जाणार आहे. या बैठकीस सर्व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.