नागपूर : शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली असेल असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर, उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही १०० पाऊल पुढे टाकू असे विधान मनसे नेत्यांनी केले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी मोठे वक्तव्य केले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले. ज्युनियर ठाकरेंचे जुळल्यानंतर सिनीयर ठाकरेंची युतीबाबत काय भूमिका असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
आता अखेर उद्धव ठाकरेंनी युतीबाबत मोठे भाष्य केले आहे. आता यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंनी युतीसाठी उद्धव ठाकरेंना टाळी दिली होती. दरम्यान यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. मात्र आता उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत मनसे नेत्यांनी व्यक्त केला आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे संकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिले आहेत.
युतीसंदर्भात सिनिअर ठाकरे बंधूंनी एकमेकांना दिलेल्या प्रतिसादानंतर आता ज्युनिअर ठाकरे बंधू देखील युतीसाठी अनुकूल आहेत. दोन्ही बंधू एकत्र आल्यास कोणताही प्रॉब्लेम नसल्याचं अमित ठाकरेंनी म्हटले होते. तर आदित्य ठाकरेंनी देखील युतीसाठी राज ठाकरेंना साद घातली होती. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसंदर्भात मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सुरूवातीला युतीसंदर्भात मनसेच्या नेत्यांमध्ये मतमतांतर होती. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सूर जुळल्यामुळे दोन्ही बंधू लवकरच एकत्र येण्याची शक्यता आहे.
उद्धव-राज ठाकरेंबाबत माध्यमातच उत्सुकता- फडणवीस यांचे वक्तव्य
दरम्यान, हे दोन भाऊ एकत्र येणार असल्याचे चर्चेकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेकमे कसे बघतात. यावर नागपुरात शनिवारी माध्यमांनी फडणवीस यांना विचारले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येण्याच्या चर्चांना उधान आले आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले. दोन्ही भावाच्या युतीवर रोज काय बोलणार आहे. मी कालच बोललो. जेवढी उत्सुकता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल माध्यमांमध्ये दिसत आहे. तेवढी दोन्ही भावांमध्ये दिसत नाही आहे.