नागपूर : ओबीसींच्या आरक्षणात नव्याने कोणी वाटेकरी होऊ द्यायचे नाही, अशी भूमिका राज्य सरकारची आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने उपोषण मागे घ्यावे आणि कुठलेही आंदोलन करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरातील ओबीसी आंदोलनाला भेट देऊन त्यांना उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – मनोहर जोशींना ‘या’ योजनेचा आनंद व दु:खही, वाचा असे का म्हणाले गडकरी
फडणवीस शनिवारी नागपुरात विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. नव्याने त्यात वाटेकरी होऊ द्यायचा नाही, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी समाजाच्या उपोषणाला भेट दिली असून ते उपोषण मागे घेतील. नागपूरच्याही उपोषण मंडपाला भेट देऊन विनंती करणार आहे. ओबीसींचे आरक्षण कमी होणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने आंदोलन करू नये, असेही फडणवीस म्हणाले.