नागपूर: विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशने १० मेपासून नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट घेणे बंद करण्याच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट बंद होणार असल्याचे दिसत असतांनाच महावितरणच्या नागपूर परिमंडळाने डिजिटल झेप घेतली आहे. महावितरणच्या या कार्यालयाचे ६५ टक्के वीज देयक डिजिटल पद्धतीने भरले जात आहे.

डिजिटल पेमेंटमुळे देशभरात फसवणुकीचे प्रकार वाढल्याने केंद्र सरकारच्या गृह खात्याकडून असे व्यवहार झालेले खाते गोठवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे या खात्यातून पेमेंट होणाऱ्या पेट्रोल पंपावरील रक्कमही गोठवली जात आहे. पेट्रोल पंपांवर रोज शेकडो नागरिकांकडून डिजिटल पेमेंट केले जाते. त्यांच्याकडील रक्कम कशाची, हे कुणीही समजू शकत नाही.

तरीही रक्कम गोठवली जात असल्याने पेट्रोल पंप चालक कंटाळले आहेत. त्यामुळे १० मेपासून डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. त्यातच महावितरणच्या संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपद्वारे वीज बिलांचा ऑनलाईन भरणा करण्यामध्ये नागपूर परिमंडलातील लघुदाब वीज ग्राहकांनी मोठी आघाडी घेतली आहे. एप्रिल महिन्यात परिमंडलातील ६५ टक्के ग्राहकांनी आपल्या वीज देयकाची भरणा ऑनलाईन पद्धतीने केले आहे.

एप्रिल २०२५ मध्ये नागपूर परिमंडलातील १२ लाख ९८ हजार ७३३ ग्राहकांनी एकूण २२९ कोटी ६ लाख रुपयांच्या वीज देयकांचा भरणा केला. यापैकी ८ लाख ४७ हजार ४०४ ग्राहकांनी २२२ कोटी रुपयांची रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरली आहे. मागील वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत तब्बल ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ६७.७ टक्के म्हणजेच ७ लाख १९ हजार ८०५ ग्राहकांनी १९४ कोटी ५० लाखाचा तर वर्धा जिल्ह्यातील ५६.३९ टक्के असलेल्या १ लाख २७ हजार ५९९ ग्राहकांनी २७ कोटी ५० लाख रुपयांचा ऑनलाईन वीज देयक भरणा केल्याची माहिती आहे.

ऑनलाईन देयक भरणाऱ्यांसाठी बक्षीस योजना

ऑनलाईन पेमेंट नंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पावती पाठवली जाते. तसेच, ऑनलाईन वीज देयक भरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्मार्ट फ़ोन, स्मार्ट वॉच यासारखे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना असल्याची माहिती महावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.