नागपूर : गणेशोत्सव साजरा करताना गर्दी, हवामानातील बदल आणि अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे श्वसनविकाराचे तसेच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे या काळात लहान मुले, वृद्ध नागरिकांसह आजार असलेल्या आणि दम्यासारख्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नागपुरातील श्वसनरोग तज्ज्ञ आणि क्रीम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक अरबट यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.
गणेशोत्सवात जोखमीतील व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांपासून अंतर ठेवावे, पौष्टिक आहार घेऊन व्यायाम करावा, पुरेशी झोप घ्यावी अशा सोप्या उपाययोजना आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असल्याचेही नागपुरातील श्वसनरोग तज्ज्ञ आणि क्रीम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक अरबट यांचे म्हणणे आहे.
लहान मुलांमध्ये जास्त धोका
लहान मुले आजारी पडल्यास त्यांना वारंवार सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे जाणवतात. छातीमध्ये घरघर, श्वास घेण्यास त्रास, सतत खोकला या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच मुलांना मास्क वापरण्याची सवय लावणे, स्वच्छ व पौष्टिक आहार देणे आवश्यक आहे, असे नागपुरातील श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट याचे म्हणणे आहे.
वृद्ध नागरिकांनी घ्यावी काळजी
हृदयविकार, मधुमेह, दमा, सीओपीडी असलेल्या रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. बदलते हवामान आणि गर्दीमुळे हे रुग्ण लवकर आजारी पडतात. त्यामुळे गर्दी टाळणे, संतुलित आहार घेणे, घरात स्वच्छ हवा राहील याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. अशोक अरबट याचे म्हणणे आहे.
लसीकरणाचे महत्त्व
फ्लू लस व न्यूमोकोकल लस श्वसनविकारांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण देतात. लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती महिला व दम्यासारख्या दीर्घकालीन आजारांनी त्रस्त व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे, असे डॉ. अशोक अरबट याचे म्हणणे आहे.
डॉक्टरांचा सल्ला
सतत उच्च ताप, छातीत दुखणे, रक्तासह खोकला, श्वास घेण्यास त्रास, अन्न न खाणे, थकवा व अशक्तपणा ही लक्षणे दिसल्यास स्वतः उपचार न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे, असा सल्ला डॉ. अशोक अरबट यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सव आनंदाचा असला तरी आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य सावधगिरी बाळगल्यास संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळू शकते आणि उत्सव निरोगीपणे साजरा करता येतो, असेही ते म्हणाले.