नागपूर :अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत जोखीम अधिक असली तरी झटपट पैसा कमावण्याची संधी असल्याने उत्तर नागपुरातील सराईतांनी आपला मोर्चा अंमली पदार्थ तस्करीकडे वळविला आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी करताना ४२ जणांना अटक केली. त्या तुलनेत २०२५मध्ये पहिल्या सहा महिन्यांतच अंमली पदार्थ तस्करीच्या घटनांमध्ये १८१ टक्क्यांनी वाढ होत हा आकडा ११८ प्रकरणांपर्यंत धडकला.

अंमली पदार्थांचे हब झालेल्या उत्तर नागपुरात उच्चभ्रुंमध्ये अफिम आणि मेफोड्रेनचा तर कमी उत्पन्न गटात गांजाचा विळखा वाढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांच्या धर्तीवरच उत्तर नागपूरची उडता पंजाब प्रमाणे वाटचाल सुरू आहे. गुन्हेगारी विश्वातल्या अन्य पारंपरिक गुन्ह्यांच्या तुलनेत उत्तर नागपूर अंमली पदार्थ तस्करीचे केंद्र बनले आहे.

नागपूर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील परिमंडळ ५ अंतर्गत जरिपटका, यशोधरा नगर, कपील नगर, नवीन कामठी, जुनी कामठी, कळमना आणि पारडी अशी ८ पोलीस ठाणे येतात. अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या या आठही पोलिस ठाण्यांमध्ये गेल्या वर्षी २०२४मध्ये खुनाच्या ४२, प्राणघातक हल्ल्याच्या ३७ गुन्ह्यांची नोंद पोलीस डायरीने घेतली. याच काळात दरोड्याची २१ आणि अपहरणाच्या ९६ तक्रारींवर पोलीसांनी गुन्हा नोंदविला. त्या तुलनेत २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत १६ खून आणि ३० प्राणघातक हल्ले झाले. जानेवारीपासून आतापर्यंत ६ महिन्यांत अपहरणाच्या ८४ घटना पोलीस डायरीवर नोंद झाल्या.

चोरीच्या घटनांत घट

उत्तर नागपुरातल्या ८ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात २०२४मध्ये चोरीच्या २९६ घटना घडल्या. यावर्षी ही संख्या २५१ वर पोचली. सोनसाखळी हिसकावणाऱ्या ४ घटनांच्या तुलनेत यावर्षी एकाही घटनेची नोंद झाली नाही. गेल्या वर्षी ४४ बलात्कारांनी हादरलेल्या उत्तर नागपूरात यावर्षी १२ ने घट झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर नागपूरातील गुन्ह्यांचा आलेख

  • कार्यक्षेत्रात ८ पोलीस ठाणे
  • एनडीपीएस अंतर्गत १८१ कारवाया
  • २०२४ मध्ये अवघ्या ४२ तक्रारी
  • चोरीच्या घटना- २५१
  • अपहरण- ८४
  • बलात्कार- ३६
  • एम. पी. डी. ए- १४

अंमली पदार्थ तस्करांसाठी उत्तर नागपूरातील सिंडिकेट उधळून लावले जात आहे. समाजमाध्यमांवरून प्रसारित होणारे आक्षेपार्ह, अश्लिल, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ३०५ जणांवरही कारवाई आतापर्यंत झाली. गरुडदृष्टी मिशनमधून समाजमाध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांकडून साडेचार कोटींचा दंड पोलिसांनी वसुल केला आहे. – निकेतन कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ५.